प्रतिनिधी,कोल्हापूर
Panhala : हिरव्यागार मखमलीत दडलेले आणि प्रथमदर्शनी पाहता क्षितीजाला जाऊन भिडलेले आहे,असे वाटणारे पन्हाळ्याजवळचे मसाई पठार महसूल व वन विभागाने संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.साधारण सहा चौरस किलोमीटरचे हे वन क्षेत्र आहे.कोल्हापूरला निसर्गाने जे काही भरभरून दिले आहे त्यात मसाई पठार एक अमूल्य असे देणे आहे.खडकाळ जांभ्या दगडातील हे पठार म्हणजे कोल्हापूर जिह्याचा निसर्ग केंद्रबिंदू मानला जात आहे.कास पठाराप्रमाणेच येथील जैवविविधता जपण्यासाठी राज्य शासनाने टाकलेले हे पाऊल आहे.
जिह्यात पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यात मसाई पठार विस्तारले आहे.ऐतिहासिक पन्हाळगडापासून जेऊर, म्हाळुंगे ही छोटी गावे सोडली की नजरेसमोर विस्तीर्ण पठार येते.पावसाळ्यात या पठारावर अक्षरशः ढग उतरतात.ढगातून चालण्याचा भास येथे होतो.इथला वारा भन्नाट या शब्दालाच पूर्ण जागतो.पाऊस कमी कमी होत आला की हिरवीगार दुलई अंगावर घेतल्यासारखे पठार भासू लागते.कोवळी गवताची पाती व विविध रानफुलांची किनार पठाराला आणखी शोभा आणते.वास्तवात जांभ्या दगडातले हे पठार पण राकट दगडातही हिरवं लुसलुशीत गवत फुलवण्याची एक मायेची ताकद कशी आहे, याचे पदोपदी दर्शन ते घडवत जाते.
पावसाळ्यात हिरवेगार असलेले पठार उन्हाळ्यात पिवळे धमक होते.पण कडक उन्हाळ्यात येथे लागणार नाही,अशी शितलता इथल्या वाऱ्याची झुळुक देऊन जाते. पठारावर धूर व धूळ नसल्याने नक्षत्राचे स्वच्छ दर्शन येथून घडते.पन्हाळा ते विशाळगड हा पायी जाण्याचा मार्ग याच पठारावरून पुढे जातो.त्यामुळे जुलै महिन्यात निघणाऱ्या पावनखिंड मोहिमामुळे शिवरायांच्या जयजयकाराने पठाराचा सारा परिसर दुमदुमून जातो.पठाराला प्राचीन इतिहासाचेही संदर्भ आहेत.पठारावर बौद्धकालीन गुंफा आहेत.स्थानिक लोक त्यांना पांडवकालीन गुंफा म्हणतात.या गुंफा म्हणजे या परिसरातील मानवी अस्तित्वाचा अस्सल पुरावा आहेत.
पठारावर मसाई देवीचे प्राचीन मंदिरही आहे.
अलीकडच्या काळात या मूळ वैशिष्ठ्याऐवजी मसाई पठार म्हणजे पर्यटन,धिंगाणा व जल्लोषाचे ठिकाण झाले होते.तेथील शांतता भंग पावली होती.हे ठिकाण वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने त्याचे संवर्धन व्हावे अशी निसर्गप्रेमीची मागणी होती.या मुद्यावर वन व महसूल विभागाने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून पठाराचे 5.34 किलोमीटर क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.यासंदर्भातील अधिसुचना बुधवारी निघाली.या राखीव क्षेत्रात म्हाळुंगे,खोतवाडी,मौजे सुपात्रे,बांदेवाडी,वेखंडवाडी,बोरीवडे,बोंगेवाडी,बांदेवाडी,जेऊर या गावाच्या काही क्षेत्राचा समावेश होतो.
अनेक बंधने येऊ शकतात
मसाई पठार नोटीफाय केल्याने पर्यटनाच्या नावाखाली अनियंत्रित वावर,पठारावरील वनवैभवाची होणारी नासधुस,अवैध बांधकामे दोन्ही यंत्रणेचा मोठ्या आवाजात वापर,वाहनांची अनियंत्रित ये-जा यावर बंधने येऊ शकणार आहेत.

