ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमधील (panjab) प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत (300 unit electricity free) देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान (bhagvant maan)यांनी आज केली.
काही दिवसांपूर्वीच आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी माध्यमांना सांगितले होते की, राज्यातील जनतेला 300 युनिट मोफत वीज देण्याच्या योजनेची ब्लू प्रिंट तयार आहे. त्यानंतर विरोधी पक्षांकडून मोफत वीज कधीपासून देणार यासंदर्भातील प्रश्न विचारले जात होते. मान यांच्या सरकारकडून आतापर्यंत यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले जात नव्हते. भगवंत मान यांच्या सरकारला सत्तेत येऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. एका महिन्याच्या सरकारच्या कामाचं रिपोर्ट कार्ड आप सरकारनं वृत्तपत्रात जाहिराती देऊन प्रसिद्ध केलं. या जाहिरातीमध्ये 1 जुलैपासून मोफत वीज देण्यात येईल, अशी घोषणा सरकारने केली आहे.
सत्तेत आल्यानंतर एक आमदार एक टर्म पेन्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णयही या सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना 101 कोटींची मदत जाहीर करण्यात आली. घरपोच रेशन देण्याचाही निर्णय आप सरकारने घेतला आहे. ग्रामीण विकास निधीसाठी 1000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. आप आमदारांना जनतेसाठी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाबमध्ये आपचं सरकार आल्यानंतर भगवंत मान यांनी 25 हजार पदांची सरकारी नोकर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱया 35 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहे.