Tarun Bharat

‘टी-20’ सामन्यात पंतच्या नेतृत्वाची ‘कसोटी’

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा टी-20 सामना, भारतासमोर मालिकेतील अस्तित्व राखण्याचे आव्हान

कटक / वृत्तसंस्था

यंदाच्या टी-20 मालिकेत केवळ ‘अपघाता’नेच नेतृत्वाची कवचकुंडले सांभाळत असलेल्या रिषभ पंतसमोर आज (रविवार दि. 12) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात आणखी एकदा बाका प्रसंग उभा ठाकलेला असणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणणे महत्त्वाचे असल्याने पंतच्या नेतृत्वाची येथे खऱया अर्थाने कसोटी लागेल. ही लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार आहे. तूर्तास, आफ्रिकन संघ मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर आहे.

यापूर्वी, नवी दिल्लीत संपन्न झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने द्विशतकी मजल मारत फलंदाजी लाईनअप फॉर्मात असल्याची जोरदार वर्दी दिली. मात्र, डेव्हिड मिलर व रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन यांनी भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत अशक्यप्राय विजयावर शिक्कामोर्तब करत अवघ्या क्रिकेट वर्तुळाला आश्चर्याचा धक्का दिला होता.

पंतकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आगामी कर्णधार म्हणून पाहिले जाते. मात्र, आयपीएल स्पर्धेपासून त्याचा प्रवास उतरणीकडे लागला आहे. त्यातच, ही मालिका गमावल्यास त्याच्यासाठी हा आणखी एक धक्का ठरेल. यंदाचा आयपीएल हंगाम पंतसाठी निराशाजनक ठरला असून तो दिल्ली कॅपिटल्सला प्ले-ऑफमध्येही स्थान निश्चित करुन देऊ शकला नव्हता. याचदरम्यान हार्दिक पंडय़ाने नेतृत्वात चुणूक दाखवून देत स्पर्धा निर्माण केली आहे.

कर्णधार या नात्याने पंत यशस्वी होणार का, याचा आताच अंदाज वर्तवणे घाईचे ठरु शकते. पण, नेतृत्वाच्या पदार्पणात पंत दडपणाखाली राहत आला असल्याचे त्याच्या बॉडी लँग्वेजवरुन दिसून येत राहिले आहे. आयपीएलमधील पर्पल कॅप विनर यजुवेंद्र चहलला पहिल्या टी-20 सामन्यात पंतने केवळ दोनच षटके दिली, तो निर्णय वादग्रस्त ठरला होता. आज दुसऱया सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी पंतसमोर गोलंदाजीची मुख्य चिंता असणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी अर्शदीप सिंग व उमरान मलिक यांना संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो.

संघातील सर्वात अनुभवी सीमर भुवनेश्वर कुमारची डेथ ओव्हर्समध्ये बरीच धुलाई झाली. शिवाय, हर्षल पटेल देखील महागडा ठरला. अवेश खान प्रभाव टाकू शकला नाही. मात्र, सर्व गोलंदाजात तो सर्वात किफायतशीर राहिला. अर्शदीप व मलिक यांनी नेट्समध्ये कसून सराव केला असून आजच्या लढतीत या दोघांपैकी एकाला संधी मिळाल्यास त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

आयपीएल अनुभवामुळे आफ्रिकन निश्ंिचत

आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने सध्याच्या आफ्रिकन संघातील काही खेळाडू भारतातच होते आणि याचा त्यांना या टी-20 मालिकेत लाभ होत असल्याचे डय़ुसेनने यापूर्वी खुल्या दिलाने मान्य केले. गुजरातला 68.71 च्या सरासरीने 481 धावांसह जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया मिलरने तोच फॉर्म येथे टी-20 मालिकेत देखील कायम राखला आहे. क्विन्टॉन डी कॉकला उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही. पण, आयपीएलमध्ये लखनौतर्फे 508 धावांचे योगदान देत त्याने आपला फॉर्म कायम राखला होता. त्या फॉर्मची येथे पुनरावृत्ती करण्यासाठी तो महत्त्वाकांक्षी असेल.

डय़ुसेन बहरात असल्याने आफ्रिकेला फलंदाजीत चिंता नसेल. आता गोलंदाजीत रबाडा व ऍनरिच नोर्त्झे भारतीय फलंदाजांची फटकेबाजी रोखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पर्नेल, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, मार्को जान्सन.

सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.

Related Stories

रोम स्पर्धेत स्वायटेक अजिंक्य

Patil_p

स्पेनचा राफेल नदाल विजेता

Patil_p

महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पाच महिलांचे अर्ज

Amit Kulkarni

ग्यानेंदो निन्गोम्बम हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

Patil_p

बीसीसीआयतर्फे लेव्हल-2 प्रशिक्षण शिबीर

Patil_p

रशियाच्या रूबलेव्हची विजयी सलामी

Patil_p