अधिकाऱयांनी दिली कामाच्या जबाबदारीची माहिती : नगरसेवकांकडून तक्रारी मांडण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष होत आले. मात्र अद्यापही नगरसेवकांना अधिकार प्राप्त झाले नाहीत. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करताना अडचणी येत असून महापालिकेत प्रत्येकवेळी नगरसेवकांना ओळख सांगावी लागते. त्यामुळे नगरसेवकांची ओळख महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱयांना करून देण्यासाठी सोमवारी ओळख परेड आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवकांनी तक्रारी मांडण्याचा प्रयत्न केला. पण केवळ ओळख परेडसाठी बैठक असल्याचे आयुक्तांनी सुनावले.
नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधींची निवड केली जाते. पण महापालिका निवडणूक होऊन वर्ष होत आले तरी महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार प्राप्त झाले नाहीत. लोकनियुक्त सभागृह नसल्याने समस्या कुणाकडे मांडायच्या, असा मुद्दा नगरसेवकांसमोर उपस्थित होत आहे. शहरातील समस्यांबाबत नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करीत आहेत. पण त्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महापालिका कार्यालयात धाव घेऊन अधिकारी व संबंधित कर्मचाऱयांकडे गाऱहाणे मांडावे लागत आहेत. पण नगरसेवक असल्याची माहिती अधिकारी व कर्मचाऱयांना नसल्याने महापालिकेत नगरसेवकांना मान-सन्मान मिळत नाही. प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी नगरसेवकांना आपली ओळख सांगावी लागत आहे. त्याचप्रमाणे नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींचे निरसन होत नाही.
नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासह नगरसेवकांची ओळख अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना करून द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी सर्व नगरसेवकांना आमंत्रित करून महापालिकेच्या अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची ओळख सोमवारी करून दिली. यावेळी महसूल विभाग, आरोग्य, कौन्सिल, सामान्य प्रशासन, आश्रय, बांधकाम विभाग, आणि नगरयोजना विभाग अशा विविध विभागातील अधिकार व कर्मचाऱयांची ओळख करून देण्यासाठी ओळख परेड आयोजित करण्यात आली होती.
केवळ ओळख करून द्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी नगरसेवकांना केली होती. तरीदेखील काही नगरसेवकांनी ओळख करून देण्याबरोबरच तक्रारींचे गाऱहाणे सांगण्यास प्रारंभ केला. पण ही बैठक केवळ ओळख करून देण्यासाठी असून ज्या तक्रारी असतील त्या वैयक्तिकरित्या विभागात जाऊन कराव्यात, अशी सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी पुन्हा एकदा नगरसेवकांना केली.
याप्रसंगी महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱयांसह नगरसेवक उपस्थित होते.