Tarun Bharat

उद्यान की जनावरांचे कुरण?

मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोरील उद्यानाची दुर्दशा : दुरुस्तीची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासाबरोबर उद्यानाच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. तसेच उद्यानाच्या विकासाकरिता लाखोच्या निधीची तरतूद केली होती. मात्र उद्यानांचा विकास साधण्यात
कॅन्टोन्मेंट बोर्डला अपयश आले आहे. कॅम्प परिसरात मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोरील गार्डनची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण उद्यान गवत, झाडे-झुडपांनी व्यापले असल्याने जनावरांचे कुरण बनले आहे.

कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये अनेक खुल्या जागा आहेत. यापैकी काही खुल्या जागा उद्यानासाठी राखीव आहेत. तसेच काही जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागेचा वापर केला जात नाही. कारण कॅन्टोन्मेंटच्यावतीने उद्यानाच्या विकासाकरिता निधीची तरतूद केली होती. मात्र निधीचा वापर करून कोणत्या उद्यानाचा विकास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कॅन्टोन्मेंटमधील काही मोजकी उद्याने वगळता अन्य उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि झाडेझुडपे वाढली असून सुशोभिकरणाऐवजी विद्रुपिकरण झाले आहे.

कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकाऱयांच्या निवासस्थानासमोरील उद्यानात विविध प्रकारची झाडे असल्याने खूपच सुंदर आणि निसर्गरम्य होते. पण सध्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सदर उद्यानात शांतता असल्याने याठिकाणी अभ्यासाकरिता मुलांची गर्दी होत असे. तसेच विविध शाळांच्या सहली आयोजित करण्यात येत होत्या. मात्र याठिकाणी असलेले साहित्य खराब झाले असल्याने उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. हे उद्यान प्रशस्त जागेत निर्माण करण्यात आल्याने उद्यानात नेहमी गर्दी होत असे. पण सध्या देखभालीअभावी गवत, झाडे, झुडपे वाढल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे.

सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे

उद्यानाच्या सभोवती असलेले तारेचे कुंपन खराब झाले आहे. सदर उद्यानाचा उपयोग मुलांना खेळण्याऐवजी जनावरे चारण्यासाठी केला जात आहे. खेळाचे साहित्य तसेच बसण्यासाठी खुर्च्या बसविण्यात आल्या होत्या. गवत व झुडपांमुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱया नागरिकांना फिरण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्लक्षित असलेल्या आणि निसर्गरम्य असलेल्या गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणीही होत आहे.

Related Stories

तालुक्याच्या विविध भागात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

पाच दिवशीय योग शिबिराची नेहरूनगर येथे सांगता

Omkar B

किल्ला तलाव विकासासाठी 7 कोटींची योजना

Patil_p

वॉटरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू..!

Rohit Salunke

राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंचे यश

Amit Kulkarni

महापौर – उपमहापौरची निवडणूक लवकर घ्या!

Amit Kulkarni