वीज अन् भाकरीची मागणी करतेय जनता
वृत्तसंस्था/ त्रिपोली
लीबियातील संसदेच्या मुख्यालयावर शनिवारी निदर्शकांनी हल्ला केला आहे. राजकीय वर्ग आणि बिघडत्या आर्थिक स्थितीच्या विरोधात मागील काही दिवसांमध्ये अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली आहेत. शेकडो निदर्शकांनी राजधानी त्रिपोली आणि अन्य शहरांमध्ये मोर्चांचे आयोजन केले आहे. या मोर्चांदरम्यान टोब्रुक शहरातील प्रतिनिधीगृह (संसद) समवेत अनेक इमारतींवर हल्ला करत जाळपोळ करण्यात आली आहे.
शांततापूर्ण निदर्शनांच्या लोकांच्या अधिकाराचा आदर तसेच संरक्षण केले जावे. परंतु दंगली आणि तोडफोडीची कृत्ये पूर्णपणे अस्वीकारार्ह आहेत असे लीबिया संबंधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष सल्लागार स्टेफनी विलियम्स यांनी म्हटले आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांनी त्रिपोली, टोब्रुक आणि बेनगाजी समवेत अनेक शहरांमध्ये झालेल्या निदर्शनांवरून चिंता व्यक्त केली आहे.
संयम बाळगण्याचे आवाहन
शांततापूर्ण निदर्शनांचा अधिकार मान्य करत संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांनी निदर्शकांना हिंसक कृत्ये टाळण्याचे आणि सुरक्षा दलांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. महासचिवांनी लीबियातील सर्व लोकांना राजकीय अडथळा दूर करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राजधानी त्रिपोलीत निदर्शकांनी सशस्त्र समुहांच्या विरोधात आवाज उठवत सुरळीत वीजपुरवठा आणि ब्रेडच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे.