Tarun Bharat

ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक

ईडीची कारवाई ः दोन दिवसांची कोठडी

कोलकाता / वृत्तसंस्था

अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. शिक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अटकेनंतर स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांची दोन दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली. शुक्रवारी त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरावरही ईडीने छापा टाकला होता. या छाप्यात सुमारे 20 कोटी इतकी रोख रक्कम मिळाल्यानंतर मंत्रीमहोदयांभोवतीही कारवाईचा फास आवळण्यात आला. ईडीने चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिलाही ताब्यात घेतले आहे.

पश्चिम बंगालमधील कथित शिक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी ईडीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी रात्रभर पार्थ चॅटर्जी यांची चौकशी केली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता एजन्सीच्या अधिकाऱयांनी चॅटर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. कथित घोटाळा झाला तेव्हा चॅटर्जी राज्याचे शिक्षणमंत्री होते. या घोटाळय़ात सहभागी असलेल्या संशयितांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग पैलूंची चौकशी करत आहे. पार्थ चॅटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. यापूर्वी सीबीआयने त्यांची दोनवेळा चौकशी केली. पहिली चौकशी 25 एप्रिल आणि दुसरी 18 मे रोजी झाली. सीबीआयने पश्चिम बंगालच्या शिक्षण राज्यमंत्र्यांचीही चौकशी केली आहे.

तृणमूलकडून कायदेशीर चाचपणी

आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र त्यांनी सविस्तर कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, विधानसभा सदस्याला अटक करण्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने याबाबत सभापतींना माहिती द्यावी, असे सभापती विमन बॅनर्जी यांनी सांगितले. “ईडी किंवा सीबीआयला कोणत्याही खासदार किंवा आमदाराला अटक करताना लोकसभा किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना कळवावे लागते. हा घटनात्मक नियम आहे, पण मला चॅटर्जीच्या अटकेबाबत ईडीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे बॅनर्जी म्हणाले.

अर्पिता मुखर्जींच्या घरी20 कोटी रुपयांची रोकड

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. अहवालानुसार, ईडीने या कारवाईत सुमारे 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईची काही छायाचित्रे व्हायरल झाली असून त्यात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा मोठा साठा पाहायला मिळत आहे. अर्पिता व्यतिरिक्त ईडीने इतर अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या यादीत मंत्री पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, आलोक कुमार सरकार, कल्याण मोय गांगुली यांचा समावेश आहे.

Related Stories

विक्रीच्या दबावात सेन्सेक्स-निफ्टी घसरले

Patil_p

मोदी आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार!

tarunbharat

शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे हा पूर्वनियोजित कट

datta jadhav

कोलकाता महापालिकेत तृणमूलची सरशी

Patil_p

स्फोटकांचा मोठा साठा बारामुल्लामध्ये जप्त

Patil_p

सोमनाथ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

Patil_p