मध्यवर्ती म. ए. समितीचे आवाहन ः संभाजी उद्यानापासून होणार सुरुवात
बेळगाव / प्रतिनिधी
1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना झाली. यामुळे बेळगाव, कारवार, बिदरसह मराठी भूभाग कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काळादिन पाळण्यात येतो. संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक काळादिन पाळतात. मराठी भाषा व संस्कृतीच्या रक्षणासाठी मंगळवार दि. 1 नोव्हेंबर रोजी मूक सायकल फेरीत सहभागी होण्याचे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले.
सकाळी 9 वा. महाद्वार रोड येथील संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला सुरुवात होणार आहे. फेरीनंतर खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना आमंत्रण देण्यात आले असून, त्यांची उपस्थिती लाभणार आहे. नागरिकांनी शांततेत काळादिन पाळावा, असे आवाहन मध्यवर्ती समितीकडून करण्यात आले आहे.