केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन, डिचोली येथील योगासन स्पर्धेचा समारोप
प्रतिनिधी /पणजी
योग बद्दलची तळागाळातून जागृती करण्याचे, योगला लोकप्रियता मिळवून देण्याचे महान कार्य पतंजली योग पीठने केलेले आहे. योगला जागतिक मान्यता मिळाली, त्यात पतंजली योग पीठाचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी केले.
योगासन स्पोर्टस् असोसिएशन ऑफ गोवातर्फे डिचोली येथील झांटय़? महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पोर्टस् स्पर्धेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर योगासना स्पोर्टस् असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष श्री. व्ही.एम. प्रभूदेसाई, सचिव श्री. संदेश बाराजणकर, कोषाध्यक्ष श्री. अरूण भट, भारतीय स्वाभिमान गोवा विभागाचे प्रमुख श्री. कमलेश बांदेकर, झांटय़? महाविद्यालयाचे प्राचर्य श्री. राजेंद्र कुंभारजुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोव्यात योगला भरारी घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, सगळय़ा सोयी उपलब्ध आहेत. योगपटू आहेत, नवीन योगपटू तयार करण्यासाठी प्रशिक्षक आहेत, स्पर्धा घेण्यासाठी जागा उपलब्ध आहे आणि मुख्य म्हणजे योगचा विकास साधण्यासाठी आवश्यक असलेली प्रबळ इच्छाशक्ती असोसिएशनच्या पदाधिकाऱयांकडे आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशासाठी सकारात्मक कार्य करण्याची करण्याची संधी मला लाभली. धारगळ येथे साकारणाऱया आयुष इस्पितळाच्या दुसऱया टप्प्यात योग आणि निसर्गोपचाराचे सर्व मूलभूत ते उच्च, असे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाईल. हे इस्पितळ निश्चितपणे गोव्याचा मानबिंदू ठरेल, असे मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.
अलीकडच्या काळात राष्ट्रीय पातळीवर विशेष कामगिरी बजावलेल्या योगपटूंचा आणि योग प्रशिक्षकांचा श्री. नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रारंभी योगपटूंनी केलेली प्रात्यक्षिके नेत्रदीपक अशीच होती.
केंद्रीय मंत्री श्री. नाईक यांच्या व्यतिरिक्त व्ही. एम. प्रभुदेसाई, प्राचार्य श्री. राजेंद्र कुंभारजुवेकर, अरुण भट यांचीही समयोचित भाषणे झाली. कमलेश बांदेकर यांनी योगासन स्पोर्टस् असोसिएनच्या कार्याचा आढावा घेतला. सचिव संदेश बाराजणकर यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.