डॉ. व्ही. एन. देसाई यांच्या हॉस्पिटलचे स्थलांतर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे नामवंत फिजिशियन डॉ. व्ही. एन. देसाई संचालित देसाई हॉस्पिटलचे खडेबाजार लोखंडे कॉम्प्लेक्समधून प्रभाजित प्लाझा, शुक्रवारपेठ (कलामंदिरच्या समोर, टिळकवाडी) येथे स्वतःच्या वास्तूत स्थलांतर झाले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन ऍकॅडमिक्स एसडीएम विद्यापीठ धारवाडचे प्रकुलगुरु डॉ. एस. के. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, उदय शिंदे उपस्थित होते.
डॉ. व्ही. एन. देसाई आणि त्यांचे सुपुत्र डॉ. परितोष देसाई या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील. हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. के. जोशी म्हणाले, आम्ही शिक्षक असलो तरी आमच्या विषयावरती आमचे अधिक लक्ष असते. परंतु विद्यार्थ्यांना अन्य गोष्टींचीही माहिती असते. त्यामुळे बहुतेकवेळा त्यांच्याकडूनही आम्ही शिकत असतो. डॉ. विजय देसाई हे माझे विद्यार्थी होते. परंतु त्यांचा मुलगा परितोष हा सुद्धा माझा विद्यार्थी आहे.
वडील आणि मुलगा या दोघांनाही शिकविण्याचे भाग्य मला लाभले. याचा मला अधिक आनंद आहे. डॉ. व्ही. एन. देसाई यांना रुग्णांच्या माहितीची नोंद ठेवण्याची सवय असून आजच्या डॉक्टरांनी सुद्धा त्याचे अनुकरण करावे. डॉ. परितोष नव्यानेच या पेशात येत आहेत. मात्र रुग्णसेवा हेच ब्रीद समोर ठेऊन पाय जमिनीवर ठेऊन वडिलांप्रमाणे त्यांनी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉक्टरांकडे उपचार घेणारे एकपात्री अभिनेते प्रा. नवनाथ शिंदे व खेडूत शिक्षण मंडळाचे राजाराम पाटील यांनी डॉक्टरांबद्दलचा आपला सकारात्मक अनुभव कथन केला. याप्रसंगी शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते डॉ. व्ही. एन. देसाई यांच्या तर उदय शिंदे यांच्या हस्ते डॉ. परितोष देसाई यांच्या कन्सल्टिंग रुमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कल्पना देसाई, आकांक्षा देसाई, प्रतिमा गौरव चव्हाण आदी देसाई कुटुंबीयांनी सर्वांचे स्वागत केले. डॉक्टरांना शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.