वृत्तसंस्था/ हैद्राबाद
नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत येथे रविवारी झालेल्या सामन्यामध्ये पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सचा तर हरियाना स्टीलर्सने तामिळ थलैवाजचा पराभव केला.
पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सचा 49-38 अशा 11 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात पाटणा पायरेट्सतर्फे रणजित नाईकने 11, आनंद तोमरने 8, मोहम्मदेज चियानाने 7 गुण नोंदविले. गेल्या वषी पाटणा पायरेट्सने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. रविवारच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सवर 18-17 अशा केवळ एका गुणाची आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात पाटणा पायरेट्सच्या अचूक आणि आक्रमक चढाईवर बंगाल वॉरियर्सचे तिसऱयांदा सर्व गडी बाद झाले. सामना संपण्यास 6 मिनिटे बाकी असताना रणजित नाईकच्या शानदार कामगिरीमुळे पाटणा पायरेट्सने हा सामना 11 गुणांच्या फरकाने जिंकला. पाटणा पायरेट्सला या सामन्यात विजयाची नितांत गरज होती. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाटणा पायरेट्सने वरचे स्थान मिळविले आहे.


या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात हरियाना स्टीलर्सने तामिळ थलैवाजचा 61-38 असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात हरियाना स्टीलर्सतर्फे बदली खेळाडू सुशील आणि राकेश नरवाल यांची कामगिरी दर्जेदार झाली. या सामन्यात मध्यंतरापर्यंत हरियाना स्टीलर्सने तामिळ थलैवाजवर 28-12 अशी 16 गुणांची बढत घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात राकेश नरवालने आपल्या सुपर रेडवर तामिळ थलैवाजचे अधिक गडी बाद केले. पाच मिनिटे बाकी असताना हरियाना स्टीलर्सने आपल्या गुणांचे अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांनी आणखी 11 गुणांची भर घालत हा सामना एकतर्फी जिंकला.