Tarun Bharat

‘तिरंगा’ एकता’ रॅलीत देशभक्ती अन् आकाशीचा पाऊस

तिरंगा रॅलीला रत्नागिरीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

प्रतिनिधी/ रत्नागिरी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फुटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरीकरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करुन दिली.

 जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याहस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, रत्नागिरी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. येथे विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. यामुळे प्रांगण फुलून गेले होते. भव्य असा राष्ट्रध्वज वर जाताना सारेजण स्वातंत्र्याचा जयघोष करीत होते व सर्वांनी आपापल्या हातातही तिरंगा सन्मानाने धरला होता. त्याच सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली, मात्र उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्या खाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र या ठिकाणी दिसून आले.

  यावेळी पोलीस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भरपावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी यावेळी राष्ट्रगीत सादर केले. क्रीडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.  या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद, व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले. रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगरपालिका यांचे चित्ररथ देखील होते. तिरंगा रॅलीला भरघोस प्रतिसाद लाभला.

    दुचाकीवर पोलीस अधीक्षकांनी केले जिल्हाधिकाऱयांचे सारथ्य

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ध्वजारोहणानंतर या ठिकाणावरुन दुचाकी, चारचाकी व रिक्षा यांची एकता तिरंगा रॅली निघाली. याला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला व ते स्वतः या रॅलीत सामील झाले. त्यांचे दुचाकीवरील सारथ्य पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.

Related Stories

मनोरूग्णालय कर्मचाऱयाची आत्महत्या

Patil_p

युवकांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

Anuja Kudatarkar

परराज्यात जाण्यासाठी साडेचार हजारहून अधिक अर्ज

Patil_p

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत वेंगुर्लेत विविध कार्यक्रम

Anuja Kudatarkar

कोरोनाग्रस्ताच्या बहिणीसह 28जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’

Patil_p

लोकसहभागातून सागरी संपत्तीचे जतन आवश्यक!

Patil_p