दुहेरी पटावर पॉक्सिंग चारीमुंड्या चीत : परमानंदचा प्रेक्षणीय विजय,कुस्त्या निकाली झाल्याने सुमारे 15 हजार शौकीन खुष
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती कुस्तीगिर संघाटना आयोजित निकाली जंगी कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी नागराज बसीडोनीने राष्ट्रीय चॅम्पियन पॉक्सिंग कुमार पंजाबचा अवघ्या तीन मिनिटात दुहेरी पटावरती चीत करुन उपस्थित 15 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. दुसऱ्या चटकदार कुस्तीत परमानंद इंगळगीने परिश्रम हरिहरचा एकेरी पटावर चीत करुन प्रेक्षणीय विजय मिळविला.
प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बसीडोनी व राष्ट्रीय चॅम्पियन पॉक्सिंग कुमार पंजाब ही कुस्ती प्रमुख पाहुणे माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, किरण जाधव, रमेश गोरल, आर. एल. चौगुले, माजी महापौर नागाप्पा सातेरी, विलास घाडी, बाळाराम पाटील, मारुती घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. या प्रमुख कुस्तीत पहिल्या मिनिटाला पॉक्सिंग कुमार पंजाबने एकेरी पट काढून नागराजला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण नागराजने त्यातून सुटका करुन घेतली. दुसऱ्या मिनिटाला नागराजने चाट मारुन पॉक्सिंगवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण पॉक्सिंगने त्यातून सुटका करुन घेतली. तिसऱ्या मिनिटाला नागराज बसीडोणीने पॉक्सिंग पंजाबवर आक्रमक चढाई करत दुहेरी पटावर पॉक्सिंगला कळत-नकळत आसमान दाखवित उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकलीत.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती खानापूर कुस्तीगिर संघाटनेचे सुरेश पाटील, पांडुरंग पाटील, लक्ष्मण बामणे, तानाजी कदम, मोदिन दावणगीरी, सातापा गोरे, डी. एम. भोसले, रामा चिनवाल, सुरेश पाटील कौंदल, सुनिल जाधव, अर्जुन जांबोटी, तानाजी कदम यांच्या हस्ते परमानंद इंगळगी व परशराम हरीहर यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला परशरामने एकेरी पट काढून परमानंदला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण परमानंद इंगळगीने त्यातून सुटका करुन घेतली. दर दुसऱ्या मिनिटाला परमानंद इंगळगीने एकेरी हाताचा कस चढून परशरामला खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परशरामला हाताला दुखापत झाली. पण लगेच परशराम त्या दुखापतीतून सावरत पुन्हा खडाखडी कुस्तीला प्रारंभ केला. चौथ्या मिनिटाला परमानंद इंगळगीने एकेरी पट काढून परशराम हरीहरला चीत करुन उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
तिसऱ्या क्रमांकाच्या गदेच्या कुस्तीत राष्ट्रीय चॅम्पियन सुनिल धारवाडने ऋतुराज शेडगे (महाराष्ट्र चॅम्पियन) याचा आठव्या मिनिटाला झोळी डावावरती चीत करुन गदेचा मानकरी ठरला.चौथ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिक्कदिनकोप व लक्ष्मण जाधव, इचलकरंजी ही कुस्ती डावप्रतीडावाने जुंजली. तर पाचव्या क्रमांकाची कुस्ती रोहित कंग्राळी व शिवानंद अंबी, कोल्हापूर या कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आल्या. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत हणमंत गंदिगवाडने बक्सू इंगळगी याचा एकचाक डावावर विजय मिळविला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत निरंजन यळ्ळूर दुखापत झाल्याने संतोष अथणीला विजयी घोषित करण्यात आले. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत महेश तिर्थकुंडेने झोळी डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. नवव्या क्रमांकाच्या आकर्षक कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने सुनील म्हेत्री अथणी याचा घिस्सा डावावर विजय मिळविला. गदेच्या कुस्तीत यशपाल राजस्थानने दिपक धारवाडचा एकचाक डावावर विजय मिळवून गदेचे बक्षीस मिळविले. मेंढ्याच्या कुस्तीत ओम घाडीने ओमकार बागेवाडीचा तर श्री घाडी यल्लूरने सलील रणकुंडेचा पराभव करुन मेंढ्याचे बक्षीस पटकाविले.
महिलांच्या कुस्तीत ममता खानापूरने कल्याणी आंबोळकरचा घिस्सा डावावरती पराभव केला. शितल खादरवाडीने सुक्षिता किणयेचा मोळी डावावरती पराभव केला. श्रद्धा बसवाणगल्लीने भक्ती खासबागचा एकचाक डावावरती, प्रांजल बिर्जे अनगोळने सिया बालिका आदर्शचा बगलडुग डावावर तर समिधा बिर्जेने मनस्वी मजगावचा आतील टांगेवर पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
प्रारंभी माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. किरण जाधव यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. हणुमान फोटोचे पूजन रमेश गोरल यांच्या हस्ते करण्यात आले. या आखाड्यात पंच म्हणून बाळाराम पाटील, ए. जी. मंतुरगी, सुधीर बिर्जे, विश्वनाथ पाटील, कृष्णा पाटील, मारुती तुळजाई, लक्ष्मण बामणे, बबन यळ्ळूर, प्रशांत पाटील, डी. एम. भोसले, चिंटू घाडी यांनी काम पाहिले. बजरंग अंबदगेरी यांच्या हलगीच्या तालावर सर्व कुसती शौकिनांना खिळवून ठेवले तर शिवकुमार माळी इचलकरंजी यांनी कुस्तीचे समालोचन केले. हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती कुस्तीगिर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.