जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना आया संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
शाळांमध्ये आया म्हणून अनेक वर्षे काम करत असताना 20 महिन्यांचे वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. यातच निवृत्तीनंतर पेन्शनदेखील नाही. याबाबत न्यायालयात धाव घेतली असता सरकार त्या ठिकाणी म्हणणे मांडण्यासही तयार नाही. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला थकित वेतन तसेच निवृत्तीनंतर पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी कर्नाटक आया संघटनेतर्फे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध सरकारी शाळांमध्ये अनेक वर्षे आम्ही काम केले. जवळपास 30 ते 35 वर्षे काम केल्यानंतर निवृत्त केले जाते. मात्र, कोणतीच पेन्शन योजना उपलब्ध नाही. एकूणच आम्हाला सरकारी योजना दिल्या जात नाहीत. त्यामुळे निवृत्तीनंतर जीवन जगणे कठीण जात आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला पेन्शन द्यावी, याबरोबरच थकित वेतनही द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी प्रिया उटी, जयश्री उटी, कमलव्वा जैनापूर, गंगम्मा कनकगिरी, एम. सुमंगल यांच्यासह कर्मचारी महिला उपस्थित होत्या.