जिल्हा पंचायतकडे निवेदनाद्वारे मागणी : जि. पं. समोर ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचे आंदोलन
बेळगाव ; ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार किमान वेतन दिले जात नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी वाढल्या आहेत. डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉटर मॅन, शिपाई, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने 2016 मध्ये ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन कायदा लागू केला आहे. मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने डाटा एन्ट्री ऑपरेटरसाठी 16957, वॉटरमनसाठी 14447, शिपाईसाठी 13812, सफाई कर्मचाऱ्यांसाठी 16957 किमान वेतन ठरविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. परिणामी दैनंदिन जीवनात समस्या निर्माण होत आहेत. काही ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटीदेखील प्रलंबित आहे. अशांना मंजुरी द्यावी, अशी मागणीदेखील कर्मचाऱ्यांनी केली आहे. शासनाने किमान वेतनाचे आदेश देऊन देखील अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांना कमी वेतनात काम करावे लागत आहे. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत नोकर संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पंचायतीकडे सादर करण्यात आले आहे.