जीएसटी विभागाची कारवाई : महामार्गावर ई-वे बिलची तपासणी : कर चुकवेगिरी करणाऱ्यांना चाप
प्रतिनिधी/कोल्हापूर
किणी पथकर नाका, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जीएसटी (वस्तू व सेवा कर) विभागाने ई-वे बिल नसणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत तब्बल चौदा लाख सत्तर हजार रूपयांचा दंड वसूल केला. जून महिन्यातील शेवटच्या आठवडयात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत विभागाकडून 20295 वाहनांच्या ई-वे बिलची तपासणी करण्यात आली. यामध्ये 20 वाहनाकडे ई-वे बिल नसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून हा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईमुळे करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
1 एप्रिल 2018 पासुन देशभरात ई-वे बिल ची प्रणाली लागू करण्यात आली. यामध्ये राज्याअंतर्गत एक लाख तर परप्रांतात पन्नास हजारापेक्षा आधिक किंमतीच्या मालाची वाहतूक करायची आसल्यास ई-वे बिल असणे बंधनकारक केले आहे. असे बिल नसल्यास संबधित वाहनावर जीएसटी विभागाकडून दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. यानुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जीएसटी विभागाने कारवाईचा बडगा उगारत वाहनांची तपासणी करून करचुकवेगिरी करणाऱया व्यापाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसुल केला. ही कारवाई अशीच सुरू राहणार आसल्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप बसेल. राज्यकर सहआयुक्त सुनिता पाटील-थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 30 आधिकारी व 110 कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.
हे ही वाचा : सेनेला आणखी एक धक्का; भावना गवळी समर्थक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात