प्रतिनिधी/ बेळगाव
देवल क्लब कोल्हापूर प्रस्तुत कलामहषी बाबुराव पेंढारकर स्मृती नाटय़ अभिवाचन स्पर्धेत रंगभूमी ग्रुप बेळगावने उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे, गडहिंग्लज, बेळगावयासह महाराष्ट्रातील 21 संघांनी सहभाग घेतला होता. नाटय़कर्मी प्रभाकर वर्तक आणि लेखिका निलांबरी कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
अभिवाचन स्पर्धेतून वाचिक अभिनयाचा कस लागतो. आवाजाचा पोत, चढ-उतार, विषयाची मांडणी, संवाद फेक यामुळे ही स्पर्धा वेगळी ठरली. रंगभूमी ग्रुपने जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘राधी’ या कथेवर आधारीत अभिवाचन केले. त्याचे लेखन व दिग्दर्शन मेधा मराठे यांचे होते. यामध्ये सुधीर व चिन्मय शेंडे, अर्चना ताम्हणकर, प्रिया काळे व मेधा मराठे यांचा सहभाग होता. पुरूष वाचिक अभिनयाचे तृतिय पारितोषिक चिन्मय शेंडे यांना मिळाले.