निवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढले ः नाराज लोकांकडून निदर्शने तीव्र
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारने पेन्शन सुधारणा विधेयक संमत करविले आहे. याच्या अंतर्गत आता निवृत्तीचे वय 62 वर्षांवरून वाढवत 64 वर्षे करण्यात आले आहे. फ्रान्सच्या संसदेत पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी घटनात्मक अधिकारांचा वापर करत मतदानाशिवायच हे विधेयक संमत करविले आहे. यामुळे देशभरात या विधेयकाच्या विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
फ्रान्समध्ये पंतप्रधानांनी कलम 49.3 चा वापर केला, याच्या अंतर्गत बहुमत नसल्यास सरकारकडे मतदानाशिवाय विधेयक संमत करविण्याचा अधिकार आहे. यानंतर विरोधी पक्षनेत्या मरीन ले पेन यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने विशेषाधिकाराचा वापर करत विधेयक संमत करविले असून यातून हे सरकार किती कमकुवत आहे हे सिद्ध होते. पंतप्रधान बॉर्न यांना राजीनामा द्यावा असे मरीन ले पेन यांनी म्हटले आहे.


विधेयक संमत झाल्यावर हजारो लोकांनी पॅरिसमध्ये प्लेस डे ला कॉनकॉर्ड पब्लिक स्क्वेअर येथे निदर्शने सुरू केली आहेत. निदर्शने रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला तसेच सुमारे 120 निदर्शकांना अटक केली आहे. पोलिसांनी संसदेसमोर निदर्शने करणाऱया लोकांना हटविले आहे. फ्रान्सच्या अनेक शहरांमध्ये सातत्याने निदर्शने सुरू आहेत. 23 मार्च रोजी संप पुकारण्याची घोषणा अनेक प्रेंच युनियन्स केली आहे.
फ्रान्सच्या संसदेत गुरुवारी कामकाज सुरू होताच वरिष्ठ सभागृहात 119-114 अशा मतविभागणीद्वारे पेन्शन सुधारणा विधेयक संमत झाले. यानंतर प्रतिनिधी गृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी कलम 49.3 वापर करण्याची घोषणा केली. हे विधेयक देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. 175 तासांपर्यंत चर्चा झाल्यावर मेहनत वाया जाऊ नये म्हणून विशेषाधिकाराचा वापर करणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.