मनपसंतीची कब्र, कपडे अन् शवपेटीची करतात खरेदी
एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सामग्रीची खरेदी केली जाते. परंतु जिवंत असतानाच लोक स्वतःच्या अंत्यसंस्कारासाठी सामग्रीची खरेदी करतात असे कधी वाचले आहे का? एका देशात लोक मृत्यूपूर्वी स्वतःसाठी कब्र, कपडे अन् कफन खरेदी करतात. याकरता एक फेस्टिव्हल देखील आयोजित केले जाते, ज्याला शुकात्सु फेस्टा नावाने ओळखले जाते.
जपानमध्ये जिवंत लोक स्वतःच्या मृत्यूनंतर आवश्यक सामग्रीची पूर्वीच खरेदी करतात. मृत्यूनंतरची तयारी करण्याचा विचार आपल्या देशात सामान्य मानला जात नाही. राजधानी टोकियोमध्ये अंत्यसंस्कार बिझनेस मेळा आयोजित होते आणि येथे लोक शॉपिंग करण्यासाठी येतात. दरवर्षी 16 डिसेंबर रोजी ‘शुकात्सु फेस्टिव्हल’ साजरा केला जातो.
या महोत्सवात सामील लोक स्वतःच्या अंत्यसंस्काराचा पोशाख निवडतात, फुलांनी भरलेल्या शवपेटीचे बुकिंग करतात आणि त्यात आडवे होत छायाचित्रे काढून घेतात. इतकेच नव्हे तर लोक दफनभूमीत भूखंडही खरेदी करतात.
मृत्यू या विषयाबद्दल लोक फारसा विचार करत नाहीत. परंतु मृत्यूचा उत्सव साजरा करणे देखील विचित्र आहे. टोकियोच्या शुकात्सू महोत्सवात लोकांना मृत्यूपूर्वी तयारी कशी करावी हे शिकविले जाते. जपानी भाषेत ‘शुकात्सु’चा अर्थ स्वतःच्या अंताची तयारी करणे असा होतो.
तर या व्यवसायाला ‘एंडिंग इंडस्ट्री’ म्हटले जाते. याचा मुख्य उद्देश लोकांना मृत्यूनंतर काय घडते आणि आपल्यामागील लोकांचे काय होणार याची जाणीव करून देणे आहे. मृत्यूनंतर संबंधिताच्या शरीराला कशाप्रकारे तयार करावे हेही शिकविले जाते. जपानमध्ये अंत्यसंस्काराचा उद्योग मोठा आहे, या महोत्सवात केवळ वृद्धच नव्हे तर मोठय़ा संख्येत तरुण-तरुणीही सहभागी होत असतात.