वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
स्क्वॅश एकेरीत महिलांमध्ये भारताच्या जोश्ना चिन्नप्पाने उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिने न्यूझीलंडच्या कॅटलीन वॅट्सचा 3-1 (11-8, 9-11, 11-4, 11-6) असा पराभव केला. कॅनडाच्या हॉली नॉटनशी तिची पुढील लढत होणार आहे. नॉटनने मलेशियाच्या ऐफा अझमनचा 3-0 असा पराभव केला.
पुरुषांच्या लॉन बॉलमध्ये भारताची जोडी दिनेश कुमार (स्किप) व सुनील बहादुर (लीड) यांनी इंग्लंडच्या जोडीचा 18-15 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. आठव्या फेरीनंतर भारतीय जोडी 10-5 अशी आघाडीवर होती.
पुरुषांच्या जलतरणमध्ये श्रीहरी नटराजने 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 25.52 से. वेळ नोंदवत उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळविली. हीटमध्ये त्याने दुसऱया क्रमांकाची आणि एकंदर आठवी जलद वेळ नोंदवली. 24.40 से. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे.
पुरुषांच्या 200 मी. बटरफ्लायमध्ये साजन प्रकाशने हीटमध्ये चौथे स्थान मिळविताना 1ः58.99 से. वेळ नोंदवली. त्याला राखीव यादीत ठेवण्यात आले होते.
महिलांच्या व्हॉल्टमध्ये भारताची प्रणती नायक अंतिम फेरीसाठी पात्र ठरली असून तिने दुसरे स्थान मिळविले. तिने पहिल्या व्हॉल्टमध्ये 13.600 व अनइव्हन बार्समध्ये 12.950 गुण घेत सरासरी 13.275 गुण नोंदवले. स्कॉटलंडच्या शॉनोन आर्चरने पहिले स्थान मिळवित 13.500 गुण नोंदवले. सांघिक विभागात प्रणती, प्रतिष्ठा सामंता, रुतुजा नटराज यांना सर्वात शेवटचे स्थान मिळाले.
पुरुषांच्या ऑल अराऊंड जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम फेरीत भारताच्या योगेश्वर सिंगला 15 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने एकूण 74.700 गुण नोंदवले. इंग्लंडच्या जॅक जार्मनने सुवर्ण, इंग्लंडच्याच जेम्स हॉल व मेरियस जॉर्जियू यांनी रौप्य व कांस्य मिळविले.
महिला वेटलिफ्टिंगमध्ये पॉपी हजारिकाला 59 किलो वजन गटात सातवे स्थान मिळाले. तिने एकूण 183 (81 व 102) किलो वजन उचलले. पदक मिळविण्यात अपयशी ठरलेली ही एकमेव भारतीय ठरली. उर्वरित पाच जणांनी पदके मिळविली आहेत.
ट्रायथलॉनमध्ये मिश्र सांघिक अंतिम फेरीत भारताने दहावे स्थान मिळविले.