नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या आतल्या भागात आणि गर्भगृहात सर्वेक्षण आणि व्हिडीओ चित्रण केले जावे, असा स्पष्ट आदेश वाराणसीतील न्यायालयाने दिला आहे. या सर्वेक्षणात कोणी अडथळे आणल्यास ते दूर करावेत. तसेच कुलूप घातले असल्यास ते तोडून सर्वेक्षण करावे, असाही आदेश देण्यात आला.
ज्ञानवापी मशिद ही काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून बांधण्यात आली आहे. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष मशिदीच्या गर्भगृहात शिवलिंग असून हिंदू देवदेवतांच्या प्रतिमाही आहेत. मशिदीच्या आतल्या भागात सर्वेक्षण केल्याशिवाय हे सत्य बाहेर येणार नाही, असे प्रतिपादन हिंदू पक्षकारांनी केले आहे. त्यानुसार न्यायालयाने मशिद परिसर आणि मशिदीच्या आतला भाग यांचे सर्वेक्षण व व्हिडीओ चित्रीकरण करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे.
कोर्ट कमिशनर बदलण्यास नकार
ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी न्यायालयाने अजय कुमार मिश्रा यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली आहे. ते पक्षपाती असल्याचा आरोप मुस्लीम पक्षकारांनी केला होता. तसेच त्यांना बदलण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो फेटाळला. मिश्रा हेच काम पाहतील, असा आदेशही गुरुवारी देण्यात आला आहे.
17 मे पर्यंत काम पूर्ण करा
येत्या 17 मे पर्यंत सर्वेक्षणाचे सर्व काम पूर्ण करण्यात यावे, असा आदेशही वाराणसी न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर सर्वेक्षणाचा अहवाल आणि व्हिडीओ चित्रण न्यायालयाला सादर केले जाणार आहे. त्याचे अवलोकन केल्यानंतर न्यायालय पुढील आदेश देणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.