वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये 2018 साली प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी आक्षेपार्ह भाषण केले होते असा दावा याचिकेतून करण्यात आला होता. याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास आम्ही इच्छुक नाही. अशाप्रकारचे खटले केवळ (वृत्तपत्रांच्या) पहिल्या पानांसाठी आहेत असे म्हणत न्यायाधीश बी.आर. गवई आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. ही याचिका मऊ जिल्हय़ातील रहिवासी नवल किशोर शर्मा यांनी दाखल केली होती.