Tarun Bharat

पेट्रोल 9.50, डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

उत्पादन शुल्क घटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, अर्थमंत्र्यांच्या घोषणेने सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

महागाईचे चटके सोसणाऱया सर्वसामान्यांना केंद्र सरकारने शनिवारी मोठाच दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे प्रतिलिटर 8 रुपये आणि 6 रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही अत्यावश्यक वस्तूंचे दर आता अनुक्रमे प्रतिलिटर साधारणतः 9.50 रुपये आणि 7 रुपये स्वस्त होणार आहे. या निर्णयाचे क्रियान्वयन त्वरित होणार असल्याने रविवारपासून वाहनधारकांना स्वस्त दरात पेट्रोल-डिझेल उपलब्ध होईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेल दरकपात आणि उज्ज्वला गॅस सिलिंडरधारकांच्यादृष्टीने दिलासादायी घोषणा शनिवारी सायंकाळी जाहीर केल्या. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार उज्ज्वला गॅसधारकांना 200 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. तसेच उत्पादन शुल्क कपातीच्या निर्णयामुळे दिल्लीत आज रविवारपासून पेट्रोलचे दर 105.41 रुपये प्रतिलिटर वरुन 95.91 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर डिझेलचे दरही दिल्लीत 89.67 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले आहेत.

दुसरी कपात

गेल्या काही महिन्यांमधील ही दुसरी दरकपात आहे. 4 नोव्हेंबर 2021 या दिवशी पेट्रोलवरील उत्पादनशुल्क 5 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादनशुल्क 10 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यानंतर भाजपशासित राज्यांनीही मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करुन हे दर आणखी कमी केले हेते. मात्र, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इत्यादी बिगर रालोआ राज्यांनी त्यावेळी त्यांच्या करांमध्ये कपात केली नव्हती. त्यानंतर आता ही दुसरी दरकपात करण्यात आली असून आता विरोधी पक्षांची राज्ये काय करणार, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. 

युद्धाचा परिणाम

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु झालेल्या युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कच्च्या इंधन तेलाच्या दरात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली होती. याच काळात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर 137 दिवस स्थिर ठेवले होते. मात्र, कच्च्या इंधन तेलाच्या दरात 84 डॉलर्सवरुन 140 डॉलर्सपर्यंत वाढ झाली होती. ही वाढ होत असताना काही काळ या दोन वस्तूंचे दर प्रतिदिन 25 ते 30 पैशांनी वाढत होते. आता ते पुन्हा पहिल्या कपातीनंतरच्या पातळीवर आले आहेत. युद्ध थांबल्यास किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन तेलदर कमी झाल्यास देशांतर्गत दरांचे दडपण आणखी कमी होऊ शकते.

भारताचे अवलंबित्व

भारत आपल्या इंधन आवश्यकतेच्या 88 टक्के इतक्या मोठय़ा प्रमाणात आयात  करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्यास अपरिहार्यपणे देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढतात. ते न वाढविल्यास केंद्र व राज्यांचे उत्पन्न कमी होऊन त्याचा परिणाम अन्य कल्याणकारी योजनांवर होत असतो, ही बाब सर्वांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे मत आहे.

पेट्रोल दरकपात सर्वात मोठी

पेट्रोलच्या दरात एकाचवेळी साधारणतः 10 रुपयांची कपात होण्याची ही प्रथम वेळ आहे, असे तज्ञांचे मत आहे. गेल्या कित्येक दशकांमध्ये एवढी दरकपात एकाच वेळी झालेली नव्हती. डिझेलमध्येही एकाचवेळी दरकपात होण्याचा हा उच्चांक असल्याची चर्चा आहे. तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनाही मोठा दिलासा आहे.

उज्ज्वला सिलिंडरधारकांना 200 रुपये सबसिडी

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनाही स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरसाठी 200 रुपयांचे अनुदान घोषित करण्यात आले. त्यामुळे या लाभार्थींना प्रत्येक वर्षी 12 सिलिंडर्स अनुदानित किमतीत मिळणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना गॅसचा एक सिलिंडर दिल्लीत 1,003 रुपयांऐवजी 803 रुपयांना मिळणार आहे. सिलिंडर घेताना त्यांना पूर्ण रक्कम द्यावी लागली तरी नंतर त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येक सिलिंडरमागे 200 रुपये जमा केले जाणार आहेत. या महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केल्या आहेत.

दडपण कमी करणारा दिवस

ड पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांवरचा भार हलका

ड उज्ज्वला योजना लाभार्थींनाही सिलिंडर स्वस्त झाल्याने मिळणार समाधान

ड बऱयाच काळानंतर ही दुसरी आणि सर्वात मोठी पेट्रोल-डिझेल दरकपात

ड आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्यास आणखी दिलासा शक्य

Related Stories

जागतिक ‘पर्यावरण दिन’ २०२२

Nilkanth Sonar

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ

Patil_p

कृषी कायद्यांविरोधात २७ सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैतांची घोषणा

Abhijeet Shinde

लसीकरणाला तुटवडय़ाचे ग्रहण

Amit Kulkarni

4 मित्रांनी सुरू केली ‘कपडय़ांची बँक’

Patil_p

निर्भयाच्या चारही दोषींना तिहार तुरूंगात फाशी

tarunbharat
error: Content is protected !!