रुपयाच्या दरात घसरण सुरूच
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
महागाईच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्मयाबाहेर गेले आहेत. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे 214 रुपयांवर असलेला पेट्रोलदर 249.80 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तसेच डिझेलचा दर 262.80 रुपये प्रतिलिटर इतका झाल्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना मोठा झटका बसला आहे. रॉकेलचा दरही 189.83 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे.
अलीकडच्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. पीठ आणि डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील परकीय चलन संपत आले आहे. पाकिस्तानला जागतिक बँक आणि आपल्या मित्र देशांकडून मदतीची अपेक्षा आहे. अशात पाकिस्तानी जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक समस्यांशी सामना करत असलेल्या पाकिस्तानात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरूच असून गेल्या चार दिवसात 35 रुपयांची घसरण झाल्याने अर्थव्यवस्थेवर आणखीनच ताण पडलेला आहे.