12 पैकी 9 उमेदवार विजयी : श्रीकांत नाईक टॉसवर जिंकले,विजयी उमेदवारांमध्ये 6 माजी अध्यक्ष
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या निवडणुकीत विठोबा देसाई व राजेश फळदेसाई यांच्या संयुक्त पॅनलने बाजी मारली. या पॅनलमधील 12 पैकी 9 उमेदवार विजयी झाले आहेत. 12 संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात होते. काल सोमवारी कुर्टी फोंडा येथील सहकार भवनमध्ये मतमोजणी होऊन निर्वाचन अधिकारी राजू मगदूम यांनी निकाल जाहीर केला.
विजयी उमेदवारांमध्ये उल्हास सिनारी, राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब, माधव सहकारी, बाबुराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभूगावकर, बाबू फाळो, अनुप देसाई व श्रीकांत नाईक यांचा समावेश आहे. विजयी उमेदवारांमध्ये सहा माजी संचालक असून तिघे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
रविवारी झालेल्या या निवडणुकीत 166 जणांनी मतदान केले होते. त्यापैकी 7 मते बाद ठरली. सर्वाधिक 80 मते उल्हास सिनारी यांना मिळाली. विजयी विठोबा देसाई व राजेश फळदेसाई यांच्या पॅनलसह माधव सहकारी व श्रीकांत नाईक अशा तीन पॅनलमध्ये ही लढत झाली. सहकारी पॅनलमधील दोघे तर श्रीकांत नाईक पॅनलमधील एक उमेदवार विजयी झाला.
टॉसवर श्रीकांत नाईक तरले
माजी अध्यक्ष श्रीकांत नाईक व विकास प्रभू यांना समान 54 मते मिळाल्याने विजयी उमेदवार निवडण्यासाठी टॉसचा पर्याय अवलंबण्यात आला. त्यात श्रीकांत नाईक यांच्या बाजूने निकाल लागल्याने ते नशिबवान ठरले. निर्वाचन अधिकारी म्हणून राज्य सहकार खात्याचे अधिकारी राजू मगदूम यांनी काम पाहिले. त्यांना वसंत नाईक व शैलेश गावडे यांनी साहाय्य केले. येत्या 30 दिवसांच्या आत संचालक मंडळ स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मगदूम यांनी दिली.
विजयी उमेदवारांमध्ये सहा माजी अध्यक्ष
विजयी उमेदवारांमध्ये राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, माधव सहकारी, बाबुराव फट्टो देसाई, अनुप देसाई व श्रीकांत नाईक हे सहाजण गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष आहेत. उदय प्रभू, नितीन प्रभूगावकर व बाबू फाळो हे पहिल्यांदाच गोवा डेअरीवर निवडून आले आहेत. हे तिघेही नवीन उमेदवार राजेश फळदेसाई व विठोबा देसाई या संयुक्त पॅनलमधील आहेत.
गोवा डेअरीला उभारी देण्यासाठी झटणार : राजेश फळदेसाई
गोवा डेअरीची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तिला नव्याने उभारी देण्यासाठी निवडून आलेले सर्व उमेदवार एकसंघ राहून झटणार आहेत. दूध उत्पादन वाढवितानाच उतरलेली विक्री पूर्वपदावर आण्यासासाठी आमचे प्रयत्न असतील. नवीन अध्यक्ष सर्वांना विश्वासात घेऊन निवडला जाईल, अशी प्रतिक्रिया राजेश फळदेसाई यांनी आपले पॅनल बहुमताने विजयी झाल्यानंतर दिली.
डेअरी सावरण्याचे मोठे आव्हान : विठोबा देसाई
सध्या गोवा डेअरी अत्यंत कठिण परिस्थितीतून जात आहे. त्यातून डेअरीला सावरण्यासाठी नवीन संचालक मंडळापुढे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सरकारचा पाठिंबा आवश्यक आहे. दूध उत्पादनात वाढ करतानाच, पशुखाद्य प्रकल्पात सुधारणा करुन शेतकऱयांना चांगल्या दर्जाचे खाद्य पुरविण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच गोवा डेअरीत या पुढे नवीन जागा भरताना शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित व पात्र उमेदवारांनाच प्राधान्य असेल, असे विठोबा देसाई यांनी सांगितले.
नवीन संचालक मंडळ स्थापनेबद्दल प्रश्नचिन्ह
दरम्यान निवडून आलेल्या सात माजी संचालकांवर उच्च न्यायालयात खटले सुरु असल्याने त्यासंबंधी अंतिम निकाल येईलपर्यंत नवीन संचालक मंडळ स्थापन करण्यास तांत्रिक अडचण असल्याची शक्यता काही माजी संचालकांनी व्यक्त केली आहे. डेअरीशी संबंधीत विविध गैरव्यवहारात ज्यांच्यावर सहकार निबंधकांनी ठपका ठेवला आहे, त्यांना न्यायायलाने सशर्थ अटींवर स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तांत्रिक मुद्दय़ावर संचालक मंडळ स्थापन करता येणार नाही, असे मत प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्यांनी मांडले.
विजयी उमेदवार विठोबा देसाई यांनी हा मुद्दा फेटाळून लावला. न्यायालयाने सर्व खटल्यांवर स्पष्टपणे स्थगिती दिलेली आहे. केवळ सन 2016 मधील नोकर भरतीमध्ये 11 कर्मचाऱयांची अतिरिक्त भरती केल्याचा खटला तेवढा प्रलंबित आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्याने गेली तीन वर्षे डेअरीवर प्रशासक व सरकारनियुक्त त्रिसदस्यीय समितीकडे कारभार होता. यावेळी या कर्मचाऱयांना नियमित पगार देण्यात आला. ते अजूनही कामावर आहेत. या प्रकरणी न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार अशी प्रतिक्रिया विठोबा देसाई यांनी व्यक्त केली.
निवडलेल्या सात संचालकांवर अपात्रतेची टांगती तलावर : सहकार निबंधकांकडे आज सुनावणी
गोवा डेअरीवर निवडून आलेल्यांपैकी सात संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यांच्यावर गोवा डेअरीच्या घोटाळ्य़ांचे आरोप आहेत. या सर्वांना आज सहकार संचालकांनी अपात्रता प्रकरणी सुनावणीसाठी सायं. 4 वा. कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोवा डेअरीवर निवडून आलेल्या 12 पैकी 7 जणांवर आरोप आहेत आणि ते अपात्रही ठरले होते. त्यावर त्यांनी स्थगिती मागितली होती व तात्पुरती स्थगिती मिळविण्यात त्यांना यशही प्राप्त झाले. आता अपात्रता प्रकरणी पुन्हा सुनावणी हाती घेण्यात येणार आहे. ज्यांच्यावर अपात्रतेची याचिका आहे अशा सर्वांना आज मंगळवारी सहकार निबंधकांच्या कार्यालयात पुन्हा सुनावणीसाठी बोलाविण्यात आलेले आहे. मर्यादित मतदार असल्याने विविध मार्गांचा अवलंब करुन पुन्हा तीच मंडळी निवडून आल्याने सरकारसमोर गंभीर पेच प्रसंग निर्माण झाला आहे.
ग्राहकांकडून वसूल केलेला सेस सरकारला भरलाच नाही
प्राप्त माहितीनुसार, गोवा डेअरीने जो दुधाचा व्यवहार केला त्यातून गोवा सरकारला आतापर्यंत रु. 33 कोटींचा सेस अद्याप दिलेला नाही. गेल्या अनेक वर्षात जनतेकडून दुधाच्या भाव फरकातून हा सेस गोवा डेअरीने वसूल केला. परंतु तो कधीच सरकारला भरला नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढत रु. 33 कोटीपर्यंत पोहोचली व एवढी रक्कम देण्याची ऐपत आता गोवा डेअरीकडे नाही.
कोटींचे कर्ज फेढण्यासाठी गोवा डेअरीकडे नाही पैसे
गुरांना जे खाद्य दिले जाते त्या पशू खाद्याचा कारखाना दि. 6 जूनपासून बंद पडला आहे. पशू खाद्यासाठी आवश्यक कच्चा माल ज्यांच्याकडून खरेदी केला त्यांची सुमारे रु. 18 कोटी देणे आहे. ते फेडण्यासाठी गोवा डेअरीकडे पैसे नाहीत. याशिवाय या अगोदर रु. 4 कोटींचे कर्ज घेतलेले आहे त्याची परतफेड करणे देखील गोवा डेअरीला शक्य झालेले नाही. त्यामुळे नव्याने सत्तेवर येणारे संचालक मंडळ खरोखरच कसा कारभार चालविणार? हा गहन प्रश्न आहे.