Tarun Bharat

‘फोन इन’ची फोनाफोनी; सामान्यांसाठी ‘संजीव’नी

‘नमस्कार, मी एसपी बोलतोय’ला प्रतिसाद : संपूर्ण दलच दक्षता मोडमध्ये, नागरिकांनी पोलीसप्रमुखांकडे मांडल्या तक्रारी

प्रतिनिधी /बेळगाव

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱयांनी मनात आणले तर खूप काही करू शकतात, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मोठय़ा पदावर काम करताना सर्वसामान्यांसाठी काही तरी करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात निर्माण झाली तरच त्यांच्या हातून विधायक घडते. बेळगाव जिल्हय़ात यापूर्वी काम केलेल्या अनेक अधिकाऱयांनी आपला ठसा कामाच्या माध्यमातून उमटविला आहे. सध्या जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील हे अशाच एका चांगल्या उपक्रमाने कौतुकास पात्र ठरत आहेत.

‘नमस्कार, मी एसपी बोलतोय. तुमच्या काय समस्या आहेत त्या मांडा’, असे सांगत त्यांनी सध्या फोन इन कार्यक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला पंधरा दिवसांतून एकदा हा कार्यक्रम घेतला जात आहे. संपूर्ण जिल्हय़ातून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांना अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांचीही चांगली साथ मिळत आहे.

बेळगाव जिल्हय़ाचा विस्तार मोठा आहे. अथणी, चिकोडी, रायबाग, कागवाड, निपाणी, सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, मुडलगी आदी भागातून आपले गाऱहाणे मांडण्यासाठी व वरि÷ अधिकाऱयांची भेट घेण्यासाठी बेळगावला यायचे झाले तर एक दिवस मोडतो. वेळ आणि पैशांच्या दृष्टिकोनातूनही हे मोठे खर्चिक काम आहे. हे ओळखून नागरिकांच्या समस्या थेट फोनवरून जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

12 नोव्हेंबर रोजी पहिला फोन इन कार्यक्रम झाला. दोन दिवस आधी एक फोन क्रमांक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आला. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत पोलीसप्रमुख फोन इन उपक्रमात थेट तक्रारी ऐकणार आहेत, असेही कळविण्यात आले होते. त्यानुसार सुमारे 68 जणांनी पोलीसप्रमुखांशी फोनवरून संपर्क साधून आपले गाऱहाणे मांडले. पंधरा दिवसात बहुतेक तक्रारींचे निवारणही करण्यात आले आहे.

दुसरा फोन इन कार्यक्रम शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी झाला. जिल्हय़ातील 65 जणांनी आपली कैफियत मांडली. बेकायदा दारूविक्री, मटका, जुगार, जमीन वाद, कौटुंबिक वाद, भाऊबंदकी, मुलींची छेडछाड आदी समस्यांबरोबरच आपल्या गावाला वेळेत बस येत नाहीत, सरकारी नोकरीतील अडचणी आदी समस्याही नागरिकांनी पोलीसप्रमुखांकडे मांडल्या. सर्व समस्या शांतपणे ऐकून ते त्या त्या पोलीसस्थानकाच्या अधिकाऱयांना सूचना देऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यास सांगत होते.

सुमारे दहा जणांची टिमच कामाला

दोन कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यापुढे दर शनिवारी हा उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी त्यांनी आपली यंत्रणा चांगलीच कामाला लावली आहे. पोलीस दलाचा प्रमुख जर सक्षम असेल तर शेवटच्या पोलिसापर्यंत दक्षता पाहायला मिळते. फोन इन उपक्रमासाठी सुमारे दहा जणांची टिमच कामाला लागते. डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी, सायबर क्राईमचे बी. आर. गड्डेकर आदी अधिकारीही या उपक्रमात असतात.

एखाद्याचा फोन आला की प्रत्येक जण त्याच्या तक्रारी नोंद करून घेतो. लगेच संबंधित पोलीस स्थानकाला मोबाईल क्रमांकासकट ती माहिती दिली जाते. यानंतर अर्धा तास किंवा एक तासाची मुदत तक्रारदाराला दिली जाते. त्या वेळेत त्याने किंवा संबंधित पोलीस स्थानकातील अधिकाऱयाने ती तक्रार निवारण करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे साहजीकच पोलीस अधिकारीही सक्रिय झाले आहेत.

पोलीस यंत्रणा सक्रिय असली तर गुन्हेगारांवर वचक बसतो. त्यामुळे साहजीकच गुन्हय़ाचे प्रमाणही घटते. अनेकवेळा तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचलेल्या नागरिकांबरोबर पोलीस व्यवस्थित वागत नाहीत. त्यामुळे पोलीस दलाबद्दल आदरापेक्षा भीतीच अधिक वाटते. नकारात्मक भावना निर्माण होते. अशावेळी संपूर्ण यंत्रणा कोलमडते. ही परिस्थिती टाळण्यासाठीच पोलीसप्रमुखांनी फोन इनच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद सुरू केला आहे. आपल्याशी पोलीस कसे वागतात, यासंबंधीची माहितीही नागरिक थेट पोलीसप्रमुखांना देऊ लागले आहेत. त्यामुळे अधिकारीही सतर्क झाले असून नागरिकांशी ते सौजन्याने वागत आहेत.

यापूर्वी ‘आक्का-ताई’ अन् ‘जनता दर्शन’

पोलीस दलात यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. हेमंत निंबाळकर जिल्हा पोलीसप्रमुख पदावर असताना महिलांचे गाऱहाणे ऐकण्यासाठी त्यांनी पोलीस स्थानकनिहाय ‘आक्का-ताई’ संमेलन सुरू केले होते. 20 जुलै 2004 ते 13 जुलै 2008 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी स्वतः अनेक संमेलने घेतली आहेत. त्यानंतर संदीप पाटील यांच्या कारकीर्दीत ‘जनता दर्शन’ हा उपक्रम राबविण्यात आला. 2 सप्टेंबर 2010 ते 6 जुलै 2013 पर्यंत ते पोलीसप्रमुख पदावर होते. या काळात दर गुरुवारी पोलीस मुख्यालयात ते ‘जनता दर्शन’ भरवायचे. जिल्हय़ातील सर्व पोलीस उपअधीक्षक यावेळी उपस्थित रहायचे. या गुरुवारी झालेल्या तक्रारींचे पुढील गुरुवारपर्यंत निवारण झालेले असायचे. सध्या डॉ. संजीव पाटील यांनी सुरू केलेला ‘फोन इन’ कार्यक्रमालाही संपूर्ण जिल्हय़ातील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

दक्षिणमुखी मारुतीचीत रुईच्या पानांची पूजा

Patil_p

कचरा वाहतूक करणारा कंटेनर माघारी धाडला

Patil_p

बलिदान मासची सोमवारी होणार सांगता

Amit Kulkarni

आम्हाला किमान 26 हजार मासिक वेतन द्या

Amit Kulkarni

पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांतून संताप

Amit Kulkarni

फुलेवाडी भविष्यात टेराकोटा कलाकारांचे गाव ठरेल!

Amit Kulkarni