देश व राज्यासाठी चांगली सेवा द्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
प्रतिनिधी /फोंडा
फिजिओथेरेपी हे परिपूर्ण व प्रभावी उपचार शास्त्र म्हणून विसकीत होत असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण जीवनातही खात्रीशीर उपाय म्हणून त्याकडे पाहिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया मिशनमध्ये फिजिओथेरेपीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या क्षेत्राती तरुण डॉक्टर्सनी लोकांना चांगली सेवा देतानाचा प्रगत ज्ञान व संशोधनावर भर द्यावा. विदेशात जाऊन अद्यावात ज्ञान आत्मसात करावे व त्याचा फायदा आपल्या देशाला व राज्याला कसा होईल हा दृष्टीकोन ठेवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फोंडा येथे सुरु असलेल्या दोन दिवशीय राष्ट्रीय फिजीओथेरेपी परिषदेच्या समारोप सोहळय़ात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. देशभरातील विविध राज्यातून सहाशेहून अधिक फिजिओथेरेपी प्रशिक्षणार्थी व तज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. डॉक्टर माणसांना जीवदान देतात, तर फिजिओथेरेपिस्ट सुखी आयुष्य जगण्याचा मंत्र देतात, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले. क्रीडा क्षेत्राबरोबरच मानवी वावर असलेल्या बहुतेक क्षेत्रात आज फिजिओथेरेपी महत्त्वपूर्ण ठरत आहे. विविध आजार, शारीरिक दोष, तसेच विकलांग व्यक्तींसह सर्वांनाच हे क्षेत्र आश्वासक व परिणामकारक वाटते. कोरोना काळात व कोरोनोत्तर काळात फिजिओथेरेपीची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मातेच्या उदरात वाढणाऱया गर्भापासून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत माणसाला फिजिओथेरेपीची गरज भासणार आहे. क्रीडा क्षेत्रात खेळांडूच्या दुखापतींवर उपचार करतानाच त्यांना दुखापत होऊ नये याची उपाययोजनाही त्यातून केली जाते, यावरुन फिजिओथेरपीचे महत्त्व कळू शकते असे मुख्यमंत्री म्हणाले.
फिजिओथेरेपी काऊंसिलसाठी सहकार्य
गोव्यात फिजिओथेरपी शिक्षण व उपचाराकडे ज्या पद्धतीने कल वाढत आहे, ते पाहिल्यास येणाऱया काळात हे शास्त्र अधिक विकसित होण्यासाठी नॅशनल फिजिओथेरपी काऊंसिलची स्थापन करण्यासाठी आपण निश्चितच पुढाकार घेणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये गोव्यातील फिजिओना स्थान द्या : डॉ. भाटीकर
व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. इफ्तिकार अली, सचिव डॉ. केतन भाटीकर, डॉ. अतूल सिंग व अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. भाटीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गोव्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये येथील स्थानिक फिजिओथेरेपिस्टना संधी देण्याची मागणी केली. फिजिओथेरेपीचे महत्त्व, कार्य, प्रभाव व विस्ताराविषयी त्यांनी सांगितले.