अरुणाचलमधील घटनेत सहवैमानिक गंभीर
इटानगर / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशातील तवांग जिह्यात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना नुकतीच घडली. या अपघातात लष्कराच्या वैमानिक विभागाचा लेफ्टनंट कर्नल हुतात्मा झाला आणि सहवैमानिक गंभीर जखमी झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली. लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे अपघातात हुतात्मा झालेल्या पायलटचे नाव आहे. जखमी सहवैमानिक हा मेजर असून त्याला कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी लष्कराच्या मुख्यालयाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. तपास दोन स्टार लष्करी अधिकाऱयाच्या नेतृत्त्वाखाली केला जाणार आहे.
लष्कराच्या वैमानिक विभागाचे चित्ता हेलिकॉप्टर तवांगजवळील सीमावर्ती भागात सामान्यपणे उड्डाण करत होते. त्याचवेळी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. दोन्ही वैमानिकांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱया पायलटवर उपचार सुरू आहेत, असे लष्कराच्या तेजपूर तळाच्या संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.
तवांग सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांना वीरमरण आल्याचे ट्विट लष्कराने केले आहे. हुतात्मा लेफ्टनंट कर्नल यादव यांना श्रद्धांजली वाहण्याबरोबरच आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असेही लष्कराने म्हटले आहे. या दुर्घटनेनंतर सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा कालबाह्य झालेल्या चित्ता आणि चेतक हेलिकॉप्टरच्या ताफ्याकडे लागल्या आहेत. देशातील प्रशिक्षणार्थी सुरक्षा जवानांकडे आधुनिक उपकरणांची कमतरता असून त्यांना बदलण्याची नितांत गरज असल्याची मागणी होत आहे. तिन्ही सेनादलांमध्ये गेल्या पाच वर्षांत विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात 42 संरक्षण जवानांचा मृत्यू झाल्याचे मार्चमध्ये संरक्षण राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले होते.