प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील गोवा शिपयार्ड ते सेंट ऍड्रय़ू चर्चपर्यंतच्या रस्त्यावर हल्ली पडलेल्या पावसात खड्डे पडायला सुरवात झालेली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
मागची तीन वर्षे रखडलेले डांबरीकरण अखेर मागच्या मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यात आले होते. मात्र, या रस्त्यावर डांबराचा शेवटचा थर घालण्याचे काम झालेच नाही. त्यामुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांच्या पावसांत उखडू लागलेला असून काळी खडी रस्त्यावर पसरू लागलेली आहे. निर्माण होऊ लागलेले खड्डे आणि पसरू लागलेली खडी अपघाताना कारण ठरण्याची शक्यता आहे. अद्याप पुढील तीन ते चार महिने पाऊस पडणार आहे. तोपर्यंत गोवा शिपयार्ड ते सेंट ऍड्रय़ू चर्चपर्यंतच्या रस्त्याचे काय होईल याची चिंता सध्या वाहन चालकांना लागलेली आहे.