तरुण-महिलावर्गाची शिवारात गर्दी : दोन दिवस अगोदरच पार्ट्यांचे नियोजन
► प्रतिनिधी/ बेळगाव
मकरसंक्रांतीनिमित्त ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे रविवारी शेती-शिवार पार्ट्यांनी फुलणार आहे. विशेषत: तरुण महिलावर्गाकडून पार्ट्यांना प्राधान्य दिले जाते. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर यंदा मकरसंक्रांतीच्या पार्ट्यांना ऊत येणार आहे. त्यामुळे तरुण आणि महिलावर्गामध्ये उत्साह दिसत आहे.
विशेषत: तालुक्यातील कंग्राळी खुर्द, कंग्राळी बी. के., यमनापूर, अलतगा, जाफरवाडी, कडोली, गौंडवाड, अवचारहट्टी, काकती, होनगा, वडगाव, कर्ले, अनगोळ, मजगाव, धामणे आदी गावांमध्ये पार्ट्यांना रंग येणार आहे. विशेषत: मांसाहारी पार्ट्यांचे आयोजन होणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासून मटण आणि चिकनची मागणी वाढणार आहे. लम्पीच्या प्रादुर्भावामुळे बकरी बाजार बंद असल्याने मटणाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्यांना मटणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मटण 680 रु. किलो तर चिकन 230 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. चिकनच्या तुलनेत मटणाचे दर अधिक असल्याने ग्राहकांना फटका सहन करावा लागणार आहे.
दरवर्षी दक्षिण भागातील आणि इतर काही गावांतून मकरसंक्रांतीनिमित्त या पार्ट्या केल्या जातात. मात्र मागील दोन वर्षात कोरोनामुळे या पार्ट्यांना ब्रेक लागला होता. मात्र यंदा पूर्ववतपणे या पार्ट्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे तरुण आणि महिलावर्गाची तयारी सुरू झाली आहे. आठ-दहा महिला एकत्रित येऊन माळरानावर किंवा शिवारात पार्टीचा बेत आखतात. त्यामुळे रविवारी कंग्राळी परिसरात पार्ट्यांना पेव येणार आहे. शिवाय मांसाहार वर्ज्य करणाऱ्या तरुण आणि महिलांकडून शाकाहारी जेवणावळीला पसंती दिली जाणार आहे.
पूर्वीपासून ही प्रथा रूढ दरवर्षी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिला एकत्रित येत पार्ट्या करतात. पूर्वीपासून ही प्रथा रूढ आहे. दहा-बारा महिला एकत्रित येऊन शिवारात या पार्ट्यांचे आयोजन करतात. त्यामुळे महिलावर्गामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या निमित्ताने मित्र-मैत्रिणी व कुटुंबीय एकत्रित येतात.