15 जणांना वाचविण्यास यश
वृत्तसंस्था/ डोडोमा
टांझानियाच्या क्हिक्टोरिया सरोवरात एक प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. बचावपथकाने आतापर्यंत 15 जणांना वाचविले आहे. प्रेसिजन एअरच्या या विमानातून किती जण प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. टांझानियाच्या कागेरा क्षेत्रातील सरोवरात हे विमान कोसळले आहे. सरोवरात अनेक जण बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रेसिजन एअर विमानात दुर्घटना घडली असून विमानतळापासून सुमारे 100 मीटर अंतरावरील सरोवरात विमान कोसळले आहे. प्रवाशांच्या संख्येबद्दल तत्काळ कुठलीच माहिती उपलब्ध झालेली नाही. दार एस सलाम शहरामधून या विमानाने उड्डाण केले होते असे क्षेत्रीय पोलीस कमांडर विलियम म्वामपाघले यांनी सांगितले आहे.
सुरक्षा दल विमानातील प्रवाशांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. टांझानियातील सर्वात मोठी खासगी एअरलाइन्सने प्रेसिजन एअरने दुर्घटनेची पुष्टी दिली आहे. बचावपथकाला दुर्घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे एअरलाइन्सने सांगितले आहे.
वादळ आणि अतिवृष्टीमुळे हे विमान क्हिक्टोरिया सरोवरात कोसळले आहे. बचाव नौकांना तैनात करण्यात आले आहे. विमानात अडकून पडलेल्या अन्य प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरक्षा दल करत असल्याचे टांझानिया ब्रॉडकास्टिक कॉर्पोरेशनने सांगितले आहे. टांझानियाचे राष्ट्रपती सामिया सुलुहू हसन यांनी बचावकार्य सुरू असल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.