आयफोन प्रकल्पाच्या कर्मचाऱयांची पायपीट
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या क्रूर झिरो कोविड धोरणामुळे स्थिती भयावह होत चालली आहे. झेंगझाऊ प्रांतात लॉकडाउनमुळे त्रस्त चीनमधील सर्वात मोठय़ा आयफोन निर्मिती प्रकल्पातील हजारो कर्मचाऱयांनी भिंतीवरून उडी घेत पलायन सुरू केले आहे. हे कर्मचारी अन्नाच्या टंचाईला तोंड देत असून पायीच घरी परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या पलायनामुळे चीनचे प्रशासन हादरले असून अनेक शहरांमध्ये अशा कर्मचाऱयांना वेगळे ठेवण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
फॉक्सकॉनच्या विशाल प्रकल्पातून पलायन करणारे हे कर्मचारी देशाच्या अन्य भागांमध्ये कोरोना संक्रमण फैलावू शकतात अशी भीती चीनला सतावत आहे. सोशल मीडियावर या प्रकल्पातून पलायन करणाऱया चिनी कर्मचाऱयांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे कर्मचारी स्वतःच्या सामग्रीसह पायीच शेकडो किलोमीटर अंतरावरील स्वतःच्या घराच्या दिशेने जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. कोरोना लॉकडाउनमुळे या भागात वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
झेंगझाऊ परिसरात 2 लाख कर्मचारी काम करतात. फॉक्सकॉन कंपनीने कर्मचाऱयांना जाण्यापासून रोखणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हेनान प्रांताची राजधानी असलेल्या झेंगझाऊमध्ये मागील 7 दिवसांमध्ये 167 कोरोनाबाधित सापडले आहेत.
यूझोउ, चांगे आणि किनयांग या शहरांच्या प्रशासनाने फॉक्सकॉन कर्मचाऱयांना घरी जाण्यापूर्वी स्थानिक अधिकाऱयांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. घरी परतणाऱया लोकांना एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणापर्यंत नेण्यासाठी वाहन उपलब्ध करण्यात येईल. दुसऱया शहरात पोहोचल्यावर या कर्मचाऱयांना क्वारेंटाइन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.