ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील अकरा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाची धग आता आणखी तीव्र झाली असून, रशियाने आज पहाटे युक्रेनियन शहर मायकोलायव्हवर जोरदार बॉम्बहल्ला केला. रशियाचे सैन्य आता युक्रेनमधील रहिवासी भागांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे जगभरातील देशांना आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनने हे युद्ध लवकरात लवकर थांबविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. मात्र, भारताने यात तथस्थ भूमिका घेतली होती. त्यानंतर 26 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी पहिल्यांदा फोनवर संवाद साधला. या प्रकरणात कोणत्याही एका बाजूचे समर्थन करण्याचे भारताने टाळले.
त्यानंतर युक्रेनने पुन्हा एकदा रशियासोबतचं युद्ध थांबवलं जावं, यासाठी भारताकडे विनंती केली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत घालण्याचे आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी भारतामधील रशियन दुतावासावर दबाव निर्माण करुन रशियाला युद्ध थांबवण्याबाबतची मागणी केली जाऊ शकते, असेही म्हटले होते.