देवघरमध्ये विमानतळाचा शुभारंभ
वृत्तसंस्था/ देवघर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी झारखंडच्या देवघरमध्ये 16 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. 410 कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या देवघर विमानतळाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले. झारखंडमधील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याचबरोबर देवघर येथे निर्माण करण्यात आलेल्या एम्सचे लोकार्पण पंतप्रधानांकडून करण्यात आले. येथील एम्समध्ये 250 बेड्सची सुविधा आहे. पंतप्रधान मोदीनी मंगळवारी देवघर येथील वैद्यनाथ मंदिरात जात पूजा केली आहे.
भगवान वैद्यनाथाच्या आशीर्वादाने 16 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि कार्यारंभ झाला आहे. या प्रकल्पांमुळे झारखंडची आधुनिक कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, आरोग्य, पर्यटन क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे. राज्यांच्या विकासातून राष्ट्राचा विकास होतो याच विचारासह मागील 8 वर्षांपासून देश काम करतोय. मागील 8 वर्षांमध्ये महामार्ग, रेल्वे, हवाईमार्ग, जलमार्ग सर्वप्रकारे झारखंडला कनेक्ट करण्याच्या प्रयत्नात हाच विचार, हीच भावना सर्वोपरि राहिली असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
उडान योजनेच्या अंतर्गत मागील 5-6 वर्षांमध्ये 70 नव्या ठिकाणांना विमानतळ, हेलिपोर्ट्स आणि वॉटर एअरोडोम्सच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. 400 हून अधिक नव्या मार्गांवर आता सर्वसामान्य नागरिकालाही हवाईप्रवासाची सुविधा मिळतेय असे मोदी यांनी म्हटले आहे. देवघर विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानतळाला आगामी दिवसांमध्ये रांची, पाटणा आणि दिल्लीशी जोडले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होत असले तरीही याचा लाभ पश्चिम बंगाल तसेच बिहारमधील अनेक क्षेत्रांना होणार आहे. म्हणजेच हे प्रकल्प पूर्व भारताच्या विकासाला वेग प्रदान करणार आहेत. कनेक्टिव्हिटीसोबत देशाची श्रद्धा आणि अध्यात्माशी निगडित महत्त्वपूर्ण स्थळांवर सुविधांच्या निर्मितीवरही केंद्र सरकार भर देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.