ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड लीडर्सच्या शिखर संमेलनासाठी टोकियोमध्ये पोहचले आहेत. टोकियोमध्ये पोहोचल्यानंतर तेथील भारतीय नागरिकांनी हातात पोस्टर घेऊन ‘मोदी, मोदी’, ‘जय श्री राम’, ‘भारतमाता के शेर आ रहे है’ अशा घोषणा देत मोदींचे अनोख्या अंदाजात स्वागत केले. यावेळी जपानमधील काही लहान मुलेही मोदींच्या भेटीसाठी थांबली होती. या मुलांनी मोदींना हिंदीतून आपली ओळख करून देत मोदींशी संवाद साधला. जपानी मुलांचं हिंदी पाहून मोदींना आश्चर्याचा धक्काच बसला. “व्वा! तू हिंदी कुठून शिकलास, फार छान समजतं तुला,” अशा शब्दात मोदींनी या मुलांचे कौतुकही केले. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
पाचवीत शिकणारा विझुकी या जपानी मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपली ओळख हिंदीतून करून दिली. त्यावेळी व्वा! तू हिंदी कुठून शिकलास? तुला छान हिंदी समजतं, अशा शब्दात त्या मुलाचे कौतुक करत मोदींनी त्या मुलाने काढलेल्या चित्रावर स्वाक्षरीही केली. मला हिंदी अगदी व्यवस्थित जमत नाही, पण मी हिंदी समजू शकतो, अशी भावना यावेळी त्या मुलाने व्यक्त केली आहे.