पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१२ मार्च रोजी) काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, देशातील गरिबांच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या दळणवळणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करत असताना, कॉंग्रेसचे सदस्य त्यांची कबर खोदण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी बेंगळूर- म्हैसूर एक्सप्रेसवेचे उद्घाटन केल्यानंतर जनसमुदायाला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी आपल्या या सहाव्या दौऱ्यात बेंगळूर- म्हैसूर दरम्यानच्या एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. त्यांना आपल्या दौऱ्यात त्यांनी कांग्रेस पक्षावर टिकास्त्र सोडले. या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस मोदींची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहे…काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे, तर मोदी बेंगळुरू- म्हैसुरू एक्स्प्रेसवे सारखे प्रकल्प बनवण्यात व्यस्त आहे. मोदी गरीब लोकांचे जीवन सुसह्य करण्यात व्यस्त आहे.” असे ते म्हणाले.
बेंगळूर- म्हैसूर एक्सप्रेसवे प्रकल्पासह अनेक विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यासाठी पंतप्रधान मोदी कर्नाटकमध्ये आहेत. आज सकाळी सहाव्या राज्याच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये एक भव्य रोड शो केला. कर्नाटकातील मंड्या शहरातील रस्त्यांवर शेकडो लोकांनी रांगा लावून पंतप्रधान मोदींचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले