रुग्णालयांच्या उद्घाटनासह विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ऑगस्ट रोजी पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयात ते रुग्णालयांच्या उद्घाटनासह विविध आरोग्यविषयक सुविधांचे लोकार्पण करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी जाहीर केले. पंजाब आणि हरियाणा या राज्यातील प्रत्येकी एका रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. हरियाणातील फरिदाबाद येथे ‘अमृता हॉस्पिटल’ आणि पंजाबमधील मोहालीतील न्यू चंदीगडमध्ये ‘होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल.
हरियाणातील फरिदाबाद येथे उभारण्यात आलेल्या 2,600 खाटांच्या अमृता हॉस्पिटलचे व्यवस्थापन माता अमृतानंदमयी मठ करणार आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी 6,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हे रुग्णालय फरिदाबाद आणि दिल्ली क्षेत्रातील लोकांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा पुरविणार आहे.
पंजाबमधील ‘होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ हे रुग्णालय भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेने 660 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. सर्व प्रकारच्या कर्करोगावरील उपचारासाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त हे रुग्णालय आहे. यामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसारख्या सुविधा असून 300 खाटांची व्यवस्था आहे.
सुरक्षेबाबत पोलीस सतर्क
या दौऱयाबाबत पंजाब पोलीस अलर्टवर असून आतापासून पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱयासाठी दोन्ही राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यापूर्वी 5 जानेवारीला पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्यामुळे त्यांचा ताफा फिरोजपूर हायवेवर 15-20 मिनिटे थांबला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.