नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंटरपोल सर्वसाधारण सभेसमोर आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत, अशी माहिती विदेश विभागाने दिली आहे. इंटरपोलची ही 90 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. इंटरपोल ही आंतरराष्ट्रीय पोलिसांची संस्था आहे. या सभेला 195 सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या प्रतिनिधींमध्ये सदस्य देशांचे गृह आणि अंतर्गत सुरक्षा मंत्री, प्रमुख पोलीस अधिकारी, राष्ट्रीय गुप्तहेर संस्थांचे प्रमुख तसेच ज्येष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश असेल. सभा 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर असे तीन दिवस आहे. येथील प्रगती मैदानात ही सभा होत असून साधारणतः दुपारी पावणेदोन वाजता पंतप्रधान मोदींच्या भाषणाला प्रारंभ होणार आहे. सर्वसाधारण सभा ही या संघटनेची सर्वोच्च नियंत्रक असून संस्थेची धेयधोरणे ठविरण्याचे काम करते. यंदा ही सभा भारतात होत असून तिची सर्व सज्जता पूर्ण झाली आहे.
भारतात ही सभा तब्बल 25 वर्षांनंतर होत आहे. भारतातील यापूर्वीची सभा 1997 मध्ये झाली होती. योगायोगाने ही सभा भारतात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालेली असताना होत आहे. ही सभा यंदा भारतात व्हावी हा प्रस्ताव सदस्य देशांनी मोठय़ा बहुमताने संमत केला होता. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल आणि इतर अधिकारी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.