आमदार विरेश बोरकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
येत्या 11 जुलैपासून होणाऱया विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे त्यांचे बहुचर्चित ’पोगो’ (पर्सन ऑफ गोवन ओरिजिन) खासगी विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी माहिती सांत आंदेचे आमदार विरेश बोरकर यांनी दिली.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरजी ने तमाम गोमंतकीयांना पोगो विधेयक विधानसभेत मांडून ते मंजूर करून घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता दि. 11 पासून होणाऱया पावसाळी अधिवेशनात ते मांडण्यात येईल व जनतेला दिलेल्या वाचनाची पूर्तता करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात सध्या मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. परप्रांतीयांमुळे गोवेकरांच्या हातातून त्यांचे पारंपरिक धरून अन्य सर्व धंदे निसटून जात आहेत. गोवेकरांना जमिनी-घरे नाहीत, यासारखे अनेक प्रश्न या विधेयकात मांडण्यात आले आहेत. त्याशिवाय मूळ गोवेकर कोण? याचे स्पष्टीकरण देताना त्यामध्ये मूळ गोवेकरांसाठी हक्क मागितले आहे. एकंदरीत या विधेयकात गोवेकरांसाठी हक्क आणि त्यांचे अस्तित्व राखण्यासाठी तरतूद केली आहे.
हे विधेयक आम्ही राज्यपाल, दोन्ही खासदार, तशेच इतर सर्व पक्षातील आमदारांनाही देणार असून या विधेयकाकडे केवळ आरजीचे विधेयक म्हणून न पाहता गोवा व गोमंतकीयांच्या हितासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन बोरकर यांनी केले.
अधिवेशन काळातच राज्यात पंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे एखाद्या आमदाराने या विधेयकास विरोध केल्यास गोमंतकीय त्याला धडा शिकवतील, असेही बोरकर म्हणाले.
दरम्यान, ह्या विधेयकाबरोबरच, बांबोळी क्रॉस जवळ उड्डाणपूल बांधावा, तसेच गोवा शिपयार्डमध्ये मूळ गोमंतकीयांना रोजगार मिळावा यासारखे ठरावही अधिवेशनात चर्चेसाठी पाठविण्यात येणार आहेत, असे बोरकर यांनी सांगितले.