मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे सूचित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. त्याबद्दल कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी आभार व्यक्त केले असून आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील विविध ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक असून त्यासाठी त्यांना तातडीने सूचित करण्याची गरज वर्तवून आलेमाव यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता.
कुंकळ्ळी येथील स्मारक, मडगाव येथील लोहिया मैदान, पणजीतील आझाद मैदान, असोळणा तसेच पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके यांच्यासह गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळ यांच्याशी संबंधित स्मारके, स्थळे सरकारने अधिसूचित केलेली नाहीत. एवढेच नव्हे तर चांदोर येथील प्राचीन महादेव मंदिर देखील या यादीत नाही, हे पाहून मला आश्चर्य वाटले होते. त्यामुळेच आपण सदर मुद्दा विधानसभेत मांडला होता, असे आलेमाव यांनी सांगितले.
त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक उत्तर देऊन सदर स्थळे सूचित करण्याचे आश्वासन दिले. पुरातत्व खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकुण 51 ‘संरक्षित ठिकाणे’ आहेत, असे आलेमाव यांनी माहिती दिली. सरकार आता लवकरात लवकर सदर अधिसूचना जारी करेल. तसेच अशा सर्व स्थळांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण प्राधान्याने हाती घेईल, असा विश्वास आलेमाव यांनी व्यक्त केला.