वृत्तसंस्था/ अल रय्यान, कतार
गोलरक्षक वोसेच स्केसनीने अप्रतिम गोलरक्षण करीत वाचवलेल्या पेनल्टीमुळे सौदी अरेबियाची बरोबरी करण्याची संधी हुकल्यानंतर पिओत्र झेलिन्स्की व रॉबर्ट लेवान्डोवस्की यांनी नोंदवलेल्या गोलांच्या बळावर पोलंडने विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात सौदी अरेबियाचा 2-0 असा पराभव केला.
या विजयामुळे 1986 नंतर प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत स्थान मिळविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. गट क मध्ये पोलंडने दोन सामन्यांतून 4 गुणांसह आघाडीचे स्थान घेतले आहे तर सौदीचे दोन सामन्यांत 3 गुण झाले आहेत. दोन्ही गोल नोंदवण्यात लेवान्डोवस्कीचा हात होता. 39 व्या मिनिटाला त्याने पुरविलेल्या चेंडूवर झेलिन्स्कीने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर त्याने स्वतःच 82 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. त्याचा हा विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच गोल असून एकूण 77 वा आंतरराष्ट्रीय गोल आहे.
सौदी अरेबियाने बराच काळ सामन्यावर वर्चस्व राखताना गोलच्या दिशेने 16 प्रयत्न केले, त्यापैकी 5 ऑन टार्गेट होते. मात्र त्यांना यापैकी एकावरही गोल नोंदवता आला नाही. पूर्वार्धातील स्टॉपेज टाईममध्ये सालेम अल दावसरीची पेनल्टी स्केसनीने अप्रतिम गोलरक्षण करीत हुकवली. पण त्यानंतर पोलंडवर सौदीला दबाव आणता आला नाही. पोलंडचा गटातील शेवटचा सामना अर्जेन्टिनाविरुद्ध होणार असून हा सामना अनिर्णीत राखल्यास त्यांना बाद फेरीत स्थान मिळणार आहे. सौदीचा शेवटचा सामना मेक्सिकोविरुद्ध होणार आहे.