अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा
प्रतिनिधी/बेळगाव
बुधवार दि. 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी बंदोबस्ताची तयारी केली आहे. अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार हे बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी स्वतः बेळगावात दाखल झाले आहेत. मंगळवारी ते अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दोनवेळा मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. आयुक्त, उपायुक्तांसह शहरातील बहुतेक अधिकारी नवखे आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवावर विरजन पडले होते. यंदा उत्सव मोठय़ा उत्साहात होणार आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस दलाने तयारी केली आहे.
पोलीस आयुक्तांनी सतत अधिकाऱयांच्या बैठका घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. प्रत्येक मंडपात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांबरोबरच मंडपात कार्यकर्तेही असणार आहेत.
शिमोगा येथील हिंदू कार्यकर्त्याच्या हत्येनंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या प्रतिमेचा अवमान करण्यात आला होता. या विरोधात प्रत्येक मंडपात सावरकरांचे छायाचित्र लावण्याची तयारी मंडळांनी केली आहे.
डीजेच्या वापरावर पोलीस अधिकारी किंवा गणेशोत्सवाच्या पदाधिकाऱयांत अद्याप चर्चा सुरू असून त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. गणेशोत्सव काळात शहरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी गस्त वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे.
850 पोलिसांसह 400 होमगार्ड बंदोबस्तासाठी होणार दाखल
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता मंगळवारी 850 पोलीस व 400 होमगार्ड बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत. बंदोबस्ताची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून मंगळवारी स्वतः अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार बंदोबस्ताचा आढावा घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. श्री विसर्जन मिरवणुकीसाठी व्यापक बंदोबस्त असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.