वृत्तसंस्था/ गाजियाबाद
एका नाटय़मय घटनाक्रमात एका खासगी वृत्तवाहिनीचे अँकर रोहित रंजन यांच्या घरी मंगळवारी सकाळी छत्तीसगड पोलिसांचे पथक पोहोचले, परंतु त्यापूर्वीच नोएडा पोलिसांनी रंजन यांना ताब्यात घेतले. नोएडामधील पोलीस स्थानकातही त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता.
रंजन यांना ताब्यात घेण्यासाठी नोएडा आणि छत्तीसगडचे पोलीस आमने-सामने आल्याने घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे एक वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यावरून रंजन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु रंजन यांना अटक केली नसल्याचे नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे.
रोहित यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल खोटे वृत्त पसरविल्याचा आरोप आहे. रोहित यांच्या विरोधात छत्तीसगडमध्येही गुन्हा नोंद झाला आहे. यापूर्वी रोहित रंजन यांनी ट्विट करत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गाजियाबादचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे मदत मागितली होती.
संबंधित प्रकरण स्थानिक पोलिसांसमोर नोंद आहे, इंदिरापुरम स्थानकाचे पोलीस घटनास्थळी असून नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे गाजियाबाद पोलिसांनी म्हटले आहे.
रोहित रंजन यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता पोहोचल्याचा आरोप छत्तीसगड पोलिसांवर केला होता. आरोपीला पूर्वसूचना देण्याचा कुठलाही नियम नाही. पोलीस पथकाने संबंधिताला न्यायालयाने बजावलेले वॉरंट दाखविले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीने सहकार्य करावे, चौकशीत सामील व्हावे आणि स्वतःचे म्हणणे न्यायालयासमोर मांडावे असे छत्तीसगड पोलिसांनी म्हटले आहे.