Tarun Bharat

निदर्शनांच्या शक्यतेमुळे पोलिसांचे शहरात शक्तिप्रदर्शन

अग्निपथ योजनेच्या विरोधात वेगवेगळय़ा संघटना निदर्शने करण्याची शक्यता : पोलिसांकडून बंदोबस्तासाठी व्यापक तयारी – जनजागृती मोहीम

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावात रविवारी सायंकाळी पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी वेगवेगळय़ा संघटना निदर्शने करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने जय्यत तयारी केली असून कोणत्याही प्रकारची आंदोलने करण्यास सोमवारी परवानगी नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस कर्नाटक दौऱयावर येत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱयाच्या वेळी अग्निपथच्या विरोधात निदर्शने करण्याआड कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचू नये, यासाठी पोलीस दलाने व्यापक खबरदारी घेतली आहे.पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे पथसंचलन झाले. कित्तूर चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली मार्गे स्टेशन रोड, अंबाभुवन सर्कल मार्गे हे पथसंचलन बेळगाव रेल्वेस्थानकावर पोहोचले.पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, वाहतूक दक्षिण विभागाचे निरीक्षक मंजुनाथ नायक आदी अधिकाऱयांनी रेल्वेस्थानकाची पाहणी केली.

बंदोबस्तासाठी रॅपिड ऍक्शन फोर्सची एक तुकडीही सायंकाळी बेळगावात दाखल झाल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. दरम्यान, सोमवारी नेमका कोणत्या संघटनेने बंद पुकारला आहे, कोणकोणत्या संघटना निदर्शने करणार आहेत, याविषयी संभ्रमाची अवस्था होती. पोलीस दलाने मात्र व्यापक तयारी केली आहे. आरपीएफ विभागाचे निरीक्षक एस. आर. कारेकर यांनीही पथसंचलनात भाग घेऊन रेल्वेस्थानकाची पाहणी
केली. बंद, निदर्शने आदी पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोशल मिडियावर लक्ष ठेवले आहे. लष्कर भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱया केंद्रातून आंदोलनासाठी चिथावणी देण्यात येत असल्याची माहिती उघडकीस येताच बेळगाव जिल्हय़ातील वेगवेगळय़ा प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन त्यांना माहिती देण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलिसांनी जनजागृतीची मोहिमही सुरू केली असून निदर्शने करण्याच्या नावे आगी लावणे, दगडफेक करणे चुकीचे आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य बरबाद करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ड्रोनची राहणार नजर

रविवारच्या पोलीस शक्तीप्रदर्शनावेळी पोलीस आयुक्तांनी ड्रोनचा वापर केला आहे. शहरातील राणी चन्नम्मा चौकासह इतर तीन चौकात पोलिसांनी ड्रोनद्वारे टेहाळणी केली. सोमवारीही ड्रोनचा वापर करण्यात येणार असून एकूण हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

व्यापक बंदोबस्त

अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनावेळी रेल्वे पेटविण्याच्या घटना घडल्या आहेत. या हिंसक आंदोलनामुळे बेळगावातही पोलिसांनी खबरदारी घेतली असून रेल्वेस्थानकावर व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनीही केले पथसंचलन

गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनीही रविवारी सायंकाळी पथसंचलन केले. अशोक चौक किल्ला येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. कोल्हापूर सर्कलपर्यंत येऊन पथसंचलनाची सांगता करण्यात आली.

Related Stories

व्यवसाय परवाना तपासणी करा

Amit Kulkarni

भाजीपाल्याच्या दरात घट

Patil_p

जिल्हा प्रशासनातर्फे वाल्मिकी जयंती उत्साहात

Amit Kulkarni

धामणेत अवतरली अवघी पंढरीनगरी

Amit Kulkarni

निवडणूक लढविण्याचे स्वप्न; पण मतदारयादीतून गायब

Patil_p

कॅन्टोन्मेंटकडून कॅटल रोडची स्वच्छता

Amit Kulkarni