डॉ. सुमन बेरी यांच्याकडे 30 एप्रिलपासून पदभार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता डॉ. सुमन के. बेरी हे 30 एप्रिलपासून नवे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणार आहेत. डॉ. राजीव कुमार यांनी त्यांच्या पदावरून पायउतार झाल्यानंतर नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी डॉ. सुमन के. बेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य आणि भारतीय सांख्यिकी आयोग, चलनविषयक धोरण आणि आरबीआयच्या तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ञ राजीव कुमार यांनी ऑगस्ट 2017 मध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. ते नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष होते. सुमारे 5 वर्षे ते या पदावर राहिले. मात्र, राजीव कुमार यांना पदावरून हटवण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
2014 मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोग असे केले होते. त्यानंतर अरविंद पनगरिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष झाले. पनागरिया यांनी राजीनामा दिल्यानंतर 1 सप्टेंबर 2017 रोजी राजीव कुमार नवीन उपाध्यक्ष झाले. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. हा आयोग देशासाठी प्रमुख धोरण ठरवण्याचे काम करतो.
राजीव कुमार हे यापूर्वी फिक्कीचे सरचिटणीस होते. 1995 ते 2005 पर्यंत त्यांनी आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम केले. ते 1992 ते 1995 या काळात अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सल्लागारही होते. 70 वषीय राजीव कुमार यांनी लखनौ विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी फिल् केली आहे.
डॉ. सुमन बेरी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ
डॉ. सुमन बेरी नीती आयोगाचे आगामी उपाध्यक्ष असतील. ते एक सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. ते जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञही होते. सुमन बेरी 2001 ते 2011 या काळात नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च, नवी दिल्लीचे माजी महासंचालकही राहिले आहेत. बेरी सध्या बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथील आर्थिक थिंक टँकमध्ये अनिवासी सहकारी आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जागतिक बँकेतून केली असून तिथे त्यांनी सुमारे 28 वर्षे सेवा केली आहे.