वृत्तसंस्था/ मुंबई
विंडीजचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार कीरॉन पोलार्डने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र खासगी टी-20 व टी-10 लीगमध्ये यापुढेही खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.
34 वर्षीय पोलार्डने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण केले आणि भारताविरुद्धच त्याने शेवटची मालिका खेळली. गेल्या अनेक वर्षापासून आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आला असल्याने भारत ही त्याची दुसरी मायभूमी बनली आहे. ‘बराच विचार व चर्चा केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षाचा असल्यापासून मी विंडीजचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि गेली 15 वर्षे मला वनडे व टी-20 क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायवास मिळाले, याचा मला अभिमान वाटतो,’ असे त्याने इन्स्टाग्राम पेजवर नमूद केले.
टी-20 क्रिकेटमधील एक धोकादायक फलंदाज अशी त्याने ओळख निर्माण केली. मात्र विंडीजतर्फे त्याची कामगिरी या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्याने 123 वनडेमध्ये 26 धावांच्या सरासरीने फक्त 2706 धावा जमविल्या आणि 55 बळी मिळविले तर 101 टी-20 सामन्यांत 25 च्या सरासरीने 1569 धावा जमविल्या आणि गोलंदाजीत 44 बळी टिपले. सहजतेने षटकार ठोकण्याची त्याची क्षमता प्रतिस्पर्धी गोलंदाजांत दहशत निर्माण करणारी होती. फुलर लेंग्थ तसेच यॉर्कर्सवर तो सरळ षटकार मारण्यात माहीर होता. त्याने 101 टी-20 सामन्यांत 99 षटकार नोंदवले आहेत, म्हणजे प्रत्येक सामन्यात जवळपास एक षटकार त्याने नोंदवला आहे. स्पिनर्सविरुद्ध तो अडखळतो, ही त्रुटी लक्षात आल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी त्याला रोखण्यासाठी त्यांचा व वाईड यॉर्कर्सचा वापर करणे सुरू केले होते.
लंकेच्या अकिला धनंजयाला टी-20 सामन्यात त्याने षटकात सहा षटकार ठोकले होते, हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हायलाईट ठरले. असा पराक्रम करणारा तो युवराज सिंग व द.आफ्रिकेचा हर्शल गिब्स यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज आहे. 2012 मध्ये विंडीजने टी-20 विश्वचषक जिंकला होता, त्या संघाचा पोलार्ड हा सदस्य होता. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये मात्र एकदाही संधी मिळाली नाही. विंडीजतर्फे वनडेमध्ये त्याने तीन शतके झळकवली असली तरी प्रँचायझीसाठी जसा त्याचा खेळ झाला, तसा खेळ त्याला विंडीजसाठी करता आला नाही. नंतरच्या काळात त्याच्या गोलंदाजीची धारही कमी होत गेली आणि लेटऑर्डर हिटर होण्यावर त्याने जास्त भर दिला. त्याचा 35 वा वाढदिवस लवकरच होणार असल्याने जास्तीत कमाई करण्यावर तो आता भर देत जगभरातील विविध लीग्समध्ये खेळणार आहे. कोव्हिडनंतर बायोबबलची सक्ती होत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जादा ओझे घेत एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाणे कठीण होणार असल्याचे लक्षात घेत त्याने हा निवृत्तीचा निर्णय घेतला.