Tarun Bharat

‘शिक्षक’साठी चुरशीने 80.57 टक्के मतदान

वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 59.68 टक्के : 23 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद : विधानपरिषदेसाठी शांततेत मतदान

प्रतिनिधी /बेळगाव

वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वांनीच कंबर कसली होती. भाजप, काँग्रेस आणि अपक्षांनीही ही निवडणूक प्रति÷sची केली. त्यामुळे जणू विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीचाही प्रचार आणि मोर्चेबांधणी सुरू झाली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांचे अनेक नेते बेळगावात दाखल होऊन त्यांनी स्थानिक नेत्यांना तसेच मतदारांना आवाहन केले होते. या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले असून 23 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत शिक्षक मतदारसंघासाठी 80.57 टक्के तर पदवीधर मतदारसंघासाठी 59.68 टक्के मतदान झाले आहे.

 मागील निवडणुकीपेक्षा यावेळी चुरशीने मतदान झाल्याचे स्पष्ट दिसून आले. मागीलवेळी वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी 53.68 तर पदवीधर मतदारसंघासाठी केवळ 45.09 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यावेळेला अधिक मतदान झाले असून चुरस वाढली आहे. त्यामुळे आता विजयी कोण होणार? याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे. अनेक मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारांनी गर्दी केली होती.

कोरोनाचे नियम पाळत मतदान प्रक्रिया पार पाडावी, अशी सूचना निवडणूक अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी केली होती. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत मतदान झाले.

पहिल्या टप्प्यामध्ये संथगतीने मतदान झाले तरी दुपारनंतर मात्र मतदानाची आकडेवारी वाढली. सोशल डिस्टन्स ठेवूनच मतदान घेतले जात होते. मतदान केंद्रासमोर मार्किंग करून मतदारांना त्याठिकाणी थांबविले जात होते. मतदान केंद्रामध्ये केवळ एकाच व्यक्तीला मतदान करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू होती. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिह्यांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, निजद व अपक्षांनी आपली प्रति÷ा पणाला लावली आहे. काँग्रेसकडून प्रकाश हुक्केरी तर भाजपकडून अरुण शहापूर यांच्यामध्ये लढत आहे तर अपक्ष उमेदवार एन. बी. बन्नूर यांनीही या सर्वांना कडवे आव्हान दिले आहे.

कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी 25 हजार 388 मतदार आहेत. तर कर्नाटक वायव्य पदवीधर संघासाठी 99 हजार 578 मतदार आहेत. याचबरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक संघासाठी 17 हजार 973 मतदार आहेत. या निवडणुकीत कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी 12 जण तर कर्नाटक वायव्य पदवीधर संघासाठी 11 जण रिंगणात आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवार दि. 15 रोजी येथील ज्योती कॉलेज येथे मतमोजणी होणार असून त्यानंतरच कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

चक्क जिल्हाधिकाऱयांनी उचलले बाकडे

विश्वेश्वरय्यानगर येथील मतदान केंद्रावर एका ठिकाणी बाकडय़ाची गरज निर्माण झाली होती. त्यावेळी बाजूला असलेले बाकडे स्वतःच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उचलले. तेथे असलेल्या कर्मचाऱयांना या घटनेमुळे चांगलाच धक्का बसला. तातडीने काही कर्मचारी धावले. मात्र जिल्हाधिकाऱयांनी असू दे प्रत्येकाने काम केले पाहिजे. ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्याठिकाणी बघत न राहता स्वतःच बाकडे उचलले आणि बाजूला ठेवले. यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले.

जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी सर्व तयारी केली होती. काकती ग्राम पंचायत कार्यालय, हिंडलगा मराठी मुलांची शाळा, शहरातील सरदार्स हायस्कूल, विश्वेश्वरय्यानगर येथील सरकारी कन्नड प्रायमरी शाळा क्रमांक 26, महांतेशनगर येथील उच्च प्राथमिक कन्नड शाळा, हुदली येथील उच्च प्राथमिक शाळा, शहरातील गणपत गल्ली येथील मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट इंग्रजी शाळा, टिळकवाडी येथील आदर्श मराठी मुलांची शाळा क्रमांक 9, शहापूर येथील चिंतामनराव हायस्कूल, सांबरा येथील मराठी मुलांची शाळा या ठिकाणी मतदान अत्यंत शांततेने पार पडले.

बेळगाव जिल्हय़ातील मतदान…

सोमवारी रात्री प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्हय़ात वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 67.80 टक्के मतदान झाले आहे. 21 हजार 88 पुरुष व 8 हजार 707 महिला अशा एकूण 30 हजार 595 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी जिल्हय़ात 86.72 टक्के मतदान झाले आहे. 7 हजार 547 पुरुष व 3 हजार 974 महिला अशा 11 हजार 521 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला.

चार जागांसाठी सरासरी 73.25 टक्के मतदान

बेंगळूर : राज्य विधानपरिषदेच्या वायव्य पदवीधर आणि दक्षिण पदवीधर तसेच पश्चिम शिक्षक मतदारसंघ आणि वायव्य शिक्षक मतदारसंघांसाठी सोमवारी सुरळीत मतदान झाले. चारही मतदारसंघांमध्ये सरासरी 73.25 टक्के मतदान झाले आहे. सकाळी 8 वाजता संथगतीने सुरू झालेल्या मतदानाला 11 नंतर वेग आला. भाजपचे बसवराज होरट्टी, अरुण शहापूर, काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी यांच्यासह एकूण 49 उमेदवार विधानपरिषद निवडणूक रिंगणात होते. बुधवार 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निकालाविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.

बेळगावसह विजापूर, बागलकोट, कारवार, म्हैसूर, चामराजनगर, मंडय़ा, हासन, धारवाड, हावेरी, गदग या 11 जिल्हय़ांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान झाले. मतदारांना अनुकूल व्हावे या उद्देशाने सोमवारी 11 जिल्हय़ांमधील शाळा-महाविद्यालयांना विशेष सुटी जाहीर करण्यात आली होती. पश्चिम शिक्षक मतदारसंघात दुपारी 12 पर्यंत 25 टक्के मतदान झाले होते. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही चुरशीने मतदान झाले.

चारही मतदारसंघांमध्ये 1,82,773 पुरुष आणि 1,03,121 महिला तसेच 28 तृतीयपंथी असे एकूण 2,84,992 मतदार होते. त्यापैकी 73.25 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधानपरिषदेचे सदस्य हनुमंत निराणी, अरुण शहापूर, बसवराज होरट्टी आणि के. टी. श्रीकंठेगौडा यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपणार असल्याने या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात आली आहे. वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, पश्चिम शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी बेळगावच्या ज्योती कॉलेजमध्ये तर दक्षिण पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी म्हैसूरच्या महाराणी महिला कॉलेजमध्ये होणार आहे.

वायव्य पदवीधर मतदारसंघात निजदने उमेदवार दिलेला नाही. उर्वरित तिन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार दिला आहे. दक्षिण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून मधु जी. मादेगौडा, भाजपमधून एम. व्ही. रवीशंकर आणि निजदमधून एच. के. रामू यांच्यासह एकूण 19 उमेदवार रिंगणात होते. वायव्य शिक्षक मतदारसंघात भाजपचे अरुण शहापूर, काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी, निजदमधून चंद्रशेखर लोणी यांच्यासह 12 जण रिंगणात होते. वायव्य पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील संक, भाजपचे हनुमंत निराणी यांच्यासह 11 जण तसेच पश्चिम शिक्षक मतदारसंघात भाजपतर्फे बसवराज होरट्टी, काँग्रेसतर्फे बसवराज गुरीकार, निजदमधून श्रीशैल गडदीम्मी यांच्यासह 7 जण रिंगणात होते.

आचारसंहिता भंगप्रकरणी आमदारांसह पाच जणांवर गुन्हा

मतदान केंद्रांवर प्रवेश करून मोबाईलवर संभाषण केल्याचा ठपका

सोमवारी वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीवेळी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भरारी पथकातील अधिकारी अजित वसंत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील एपीएमसी पोलीस स्थानकात कलम 188 व 131(बी) आरपी ऍक्ट अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत विधान परिषदेसाठी मतदान झाले. विश्वेश्वरय्यानगर येथील बुथ क्रमांक 28 (ए) मतदान केंद्रावर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आमदार व त्यांचे कार्यकर्ते दाखल झाले. मतदारयादीत नावे नसताना त्यांनी मतदान केंद्रांवर प्रवेश करून मोबाईलवर संभाषण केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

बेळगाव उत्तरच्या आमदारांबरोबरच नगरसेवक श्रेयश नाकाडी, प्रवीण पाटील (दोघेही रा. शाहूनगर), संदीप जिरगीहाळ (रा. हनुमाननगर), मोहन उगार (रा. शिवबसवनगर) यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पैसे वाटताना दोघे ताब्यात…

मतदानादिवशी मतदारांना पैसे वाटताना दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे काँग्रेस समर्थक असून त्यांना खडेबाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार शरद पाटील (वय 53) व गोपाल मगदूम (वय 57) दोघेही राहणार चंदूर ता. चिकोडी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बुरूड गल्ली परिसरात हा प्रकार घडला असून त्यांच्याजवळून 60 हजार रुपये ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Stories

भरधाव कारची दुचाकीला धडक

Tousif Mujawar

बाजार गल्लीतील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

मार्केट यार्ड परिसरात गांजा विकणाऱया तरुणाला अटक

Amit Kulkarni

भातकांडे स्कूलतर्फे श्वेता जाधवचा गौरव

Amit Kulkarni

महिला सबलीकरणासाठी हवी ग्रामसभा

Amit Kulkarni

‘जय श्रीराम’च्या जयघोषात जन्मोत्सव

Amit Kulkarni