7 डिसेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सर्व 250 प्रभागांसाठी रविवारी 50 टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत केवळ 30 टक्के मतदान झाले होते. मात्र, सायंकाळच्या सत्रात मतदानाचे प्रमाण वाढल्याने दिवसअखेर 50 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. टक्केवारीची अधिकृत आकडेवारी सोमवारी स्पष्ट होईल. तसेच या मतदानाची मतमोजणी बुधवार, 7 डिसेंबर रोजी होणार आहे.
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरशीची लढत होत आहे. एकीकडे भाजप मद्य धोरण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून आम आदमी पक्षावर हल्लाबोल करत आहे, तर दुसरीकडे दिल्लीतील अस्वच्छतेला भाजपच जबाबदार असल्याचे आपचे म्हणणे आहे. दुसरीकडे, येथे मतदारयादीत घोळ झाल्याचा आरोप करत भाजप आणि आपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनिष शिसोदिया यांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावत अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासह सिव्हिल लाईन्समधील मतदान केंद्रावर मतदान केले. तसेच भाजप खासदार गौतम गंभीर आपल्या पत्नीसह मतदान केंद्रावर पोहाचला होता. भाजप खासदार परवेश वर्मा आणि त्यांच्या पत्नीने मतियाला गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कृष्णानगर येथील मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले.
मतदारांना पैसे वाटल्याची तक्रार
एमसीडीच्या वॉर्ड क्रमांक 166 (पुष्प विहार वॉर्ड) मधील आम आदमी पक्षाचे उमेदवार अरुण नवरिया यांनी मदनगीरच्या बुद्ध पार्कमध्ये भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास मदनगीर येथील बुद्ध पार्क येथे भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी तपास अधिकारी आंबेडकर नगर येथे घटनास्थळी पोहोचले असता भाजपचा एकही कार्यकर्ता आढळून आला नाही.