वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा येथील सरकारी मराठी शाळेच्या बाजूने जाणाऱया हिंडलगा ते गणेशपूर संपर्क रस्त्याच्या डांबरीकरणाकडे गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असून, येथून प्रवास करणाऱया वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हिंडलगा ते गणेशपूरला जाणारा हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे गणेशपूरला जाण्यासाठी किंवा गणेशपूरहून हिंडलग्याला येण्यासाठी बहुतांश वाहनधारक व परिसरातील रहिवासी याच रस्त्याचा अधिकाधिक वापर करतात. गेल्या काही वर्षांपासून सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. परिणामी रस्त्यावरील सततच्या वर्दळीमुळे ठिकठिकाणचा डांबर उखडून गेला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना येथून प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. खड्डय़ांतून वाहन गेल्याने बाजूने चालत जाणाऱया पादचाऱयांच्या अंगावर सांडपाणी उडून कपडे खराब होण्याच्या घटना घडत आहेत.
मध्यंतरी सदर रस्त्याचे काही अंतरापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आले. पण, सरकारी मराठी शाळेपासून ते समर्थ कॉलनीपर्यंतचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. याबाबत रहिवासी व ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायतीसह ग्रामीण आमदारांकडे अनेकदा तक्रार करूनही अद्याप कोणीच दखल घेतली नाही. याचा नाहक त्रास परिसरातील रहिवासी व वाहनधारकांना होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, त्वरित रस्त्याचा विकास करून नागरिकांचे होणारे हाल थांबविण्याची मागणी होत आहे.