खेळण्यासाठीचे सर्व साहित्य खराब, झाडेझुडुपे वाढल्याने कोणी फिरकेनात, आमदार दिगंबर कामत यांनी लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
आकें-मडगाव येथील कॉस्ता फॅक्टरीनजीकच्या परिसरात खासदार निधीतून 2011 साली उभारण्यात आलेल्या बालोद्यानाची सध्या दैना झाली असून त्याची देखभाल ठेवली गेली नसल्याने सध्या तेथे कोणी फिरकत नसल्याचे दिसून येते. स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी या प्रकरणी लक्ष घालून आवश्यक डागडुजी करून घ्यावी आणि हे बालोद्यान वापरण्याजोगे करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी असलेले समाजसेवक अँड्रय़ू सिकेरा यांनी केली आहे.
सुमारे 12 लाख रु. खर्चून सदर खुली जागा बालोद्यान उभारून विकसित करण्यात आली होती. तत्कालीन खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी खासदार निधीतून निधी उपलब्ध केल्याने त्यांच्या हस्ते या बालोद्यानाचे उदघाटन करण्यात आले होते. मडगावचे आमदार कामत तसेच तत्कालीन नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यावेळी उपस्थित होते. पालिकेचे नुकतेच नगराध्यक्ष बनलेले दामोदर शिरोडकर यांच्या प्रभागात सदर बालोद्यान उभारण्यात आले होते. त्यावेळी तेच या प्रभागाचे नगरसेवक होते, याकडे सिकेरा यांनी लक्ष वेधले आहे.
नुकताच पदपथ सुशोभिकरणासाठीच्या 21 लाखांच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार कामत यांनी या प्रभागात केला आहे. परंतु कामे पूर्ण केल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे देखभाल ठेवली जात नसल्याने नंतर त्याची दैना होत असते हे आमदार व संबंधित नगरसेवकाने लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सिकेरा यांनी म्हटले आहे.
सदर बालोद्यानातील झोपाळे, घसरगुंडी आदी खेळण्यासाठीची साधने गंजून खराब झालेली आहेत. तसेच बाकही मोडून गेले आहेत. येथे झाडेझुडुपे वाढल्याने सरपटणारे प्राणी सर्रासपणे आढळून येतात. त्यामुळे कोणी येथे फिरायला येण्यास घाबरतात. या बालोद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची होती. पालिकेची होती, तर त्यांचे दुर्लक्ष का झाले, असे सवाल सिकेरा यांनी केले आहेत. सरकारी निधीचा हा अपव्यय आहे. विकासकामे राबवून कमिशन खायचे आणि नंतर हात वर करायचे असे प्रकार काहींनी चालविले आहेत, असा दावा त्यांनी केला असून, आमदार कामत यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.